मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील आपला दवाखाना या योजनेला सध्या विविध गैरसोयीनी ग्रासले आहे. या दवाखान्यात अनेक औषधांची कमतरता, साफसफाई, वीज, पाणी या सुविधांचा अभाव आहे. या गैरसोयीकडे शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकाने महापालिकेचे लक्ष वेधले आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा १७ नोव्हेंबर २०२२ रोजी हिंदुह्दयस्रमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘हिंदुह्दयस्रमाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. पालिकेच्या प्रुमुख रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी मुंबईत प्रत्येक ५०० मीटरच्या परिघात एक आपला दवाखाना सुरू करण्याचा संकल्प तेव्हा पालिकेने केला होता. वस्त्यांमधील या दवाखान्यांमध्ये उपचार, औषधे मोफत मिळतील अशी ही योजना आहे. मात्र या दवाखान्यामध्ये मोठया प्रमाणावर गैरसोयी असून दवाखान्यातील समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिकेने एक विशेष समिती नेमावी अशी मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरवाच्या सूचनेद्वारे केली आहे. ही मागणी महापालिका सभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
पडवळ यांनी महापौराना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबईत २०० पेक्षा अधिक दवाखाने सर्वसामान्यांसाठी व गोरगरीब नागरिकांसाठी मोफत आरोग्य सेवा देणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश सामान्य नागरिक आणि गोरगरीब रहिवाशांना त्यांच्या घराजवळ मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. परंतु सद्यस्थितीत या दवाखान्यात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. औषधांची कमतरता, साफसफाई, विद्युत, पाणी अशा मूलभूत सुविधा नसणे अशा अनेक समस्या दवाखान्यात आहेत. त्यामुळे दवाखान्यातील समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिकेने एक विशेष समिती नेमावी, अशी मागणी पडवळ यांनी केली आहे.
समितीवर नगरसेवकांना घ्यावे…
आपला दवाखानाच्या समितीवर विभागातील स्थानिक नगरसेवक, आरोग्य अधिकारी यांना घ्यावे. त्यामुळे दवाखान्याबाबत काही नागरिकांच्या सूचना असतील तर त्या सूचनांचे निराकरण होईल, अशी मागणीही पडवळ यांनी केली आहे. ही ठरावाची सूचना येत्या महासभेसमोर मंजुरीसाठी येणार आहे.
दरम्यान, ‘आपला दवाखाना’ सकाळपासून रात्री उशीरापर्यंत सुरू असावे . रुग्णांना औषधोपचारांबरोबरच रोग निदान, चिकित्सा यांचीही सोय उपलब्ध करून देता यावी या उद्देशाने हे दवाखाने सुरु करण्यात आले होते. मात्र वाढत्या दवाखान्यांबरोबर मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे पालिकेने या दवाखान्यांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने घेण्याचेही ठरवले होते. मात्र तरीही या दवाखान्यात गैरसोयी आहेत.
