मुंबई : राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि अन्य धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करून उत्सवांवरील खर्चात बचत करावी आणि ही रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. शिवसेना पदाधिकारी, सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाअभावी उभी पिके करपल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर उत्सवांच्या खर्चाला काही प्रमाणात मर्यादा घालून त्यातून उपलब्ध होणारा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.

‘राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आमच्या बळीराजाचा आहे,’ या भूमिकेचा पुनरुच्चार करताना शिंदे यांनी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. मात्र नैसर्गिक संकटाच्या काळात केवळ शासनानेच नव्हे, तर समाजानेही पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शेतकरी संकटात असताना नवरात्रोत्सव किंवा अन्य सण मोठ्या थाटामाटात साजरे करणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी उत्सवांचे स्वरूप साधे ठेवावे. शिवसेनेचे पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनीही उत्सवांवरील अनावश्यक खर्च टाळून बचत झालेला निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत आणि पुनर्वसनासाठी देण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.

शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आणि समाजजीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. अन्नदाता संकटात असताना त्याच्या मदतीला समाजातील विविध घटकांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. शासनाच्या मदतीबरोबरच सामाजिक सहभाग वाढल्यास संकटग्रस्त कुटुंबांना आधार मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्सवावरील खर्चात बचत करून एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार देता आला, त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणता आले, तर तीच आदिशक्ती जगदंबेची खरी सेवा ठरेल, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.