eknath shinde calls devendra fadnavis as CM in live program | Loksatta

X

Video: जेव्हा मुख्यमंत्रीच विसरतात आपण मुख्यमंत्री आहोत! भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले ऐकलं का?

देवेंद्र फडणवीसांसमवेत ड्रायव्हिंगच्या अनुभवाविषयीही यावेळी एकनाथ शिंदेंनी मिश्किल टिप्पणी केली!

Video: जेव्हा मुख्यमंत्रीच विसरतात आपण मुख्यमंत्री आहोत! भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले ऐकलं का?
एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचाच केला 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राजकीय वर्तुळात कायमच सत्ताधारी आणि विरोधक किंवा सत्तेतील मित्रपक्ष किंवा अगदी एकाच पक्षातील नेतेमंडळींमध्येही कलगीतुरा रंगताना आपण पाहातो. सामान्य जनतेसमोर नेहमीच आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळतं. जाहीर सभा किंवा कार्यक्रमांमधून केलेल्या भाषणांचा वापर अशी टोलेबाजी करण्यासाठी ही मंडळी करत असल्याचं दिसून येतं. मात्र, काही वेळा अशा भाषणांमधून अनेक दिग्गज आणि महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती चुकून काही उल्लेख करून जातात आणि ते उल्लेख नंतर चर्चेचा विषय ठरतात. मग मूळ भाषणापेक्षाही अशा उल्लेखांचीच चर्चा जास्त झाल्याचं पाहायला मिळतं. सोमवारी पार पडलेल्या स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यातही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच केलेला असा एक उल्लेख चर्चेचा विषय ठरला आहे!

YouTube Poster

नेमकं घडलं काय?

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, संजय शिरसाट अशी शिंदे गट आणि भाजपामधील अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या उद्घाटनपर भाषणापेक्षाही त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच केलेल्या उल्लेखाची जास्त चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदेंनी केलेला उल्लेख ऐकून खरंतर तिथेच त्यात बदल करणं आवश्यक होतं. पण विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह व्यासपीठावरील कुणाच्याही ही बाब लक्षात आली नाही. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या उल्लेखामध्ये कोणताही बदल किंवा दुरुस्ती केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तेव्हा आपण नेमकी काय गडबड केली, याचा अंदाज आला नसावा, असं बोललं जात आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणाची सुरुवात कोकणी भाषेत बोलून केली. “कसा काय असात तुम्ही? कोकण महोत्सवाक हजर ऱ्हाऊक मका आनंद झालो असा”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “केसरकरांना मघाशी मी विचारून घेतलं की यात मी काही चुकीचं नाही ना बोलत! नाहीतर सगळे लोक दुर्बिण लावून बसलेले असतात”, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मात्र, त्याच्याच पुढच्या वाक्यात मुख्यमंत्र्यांनी स्वत:च केलेली चूक त्यांच्या लक्षात आली नाही. बोलण्याच्या ओघात एकनाथ शिंदेंनी चक्क देवेंद्र फडणवीस यांचाच लाडके मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला! “स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…” असं म्हणून एकनाथ शिंदेंनी पुढे व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांची नावंही घेतली. पुढे सगळं भाषणही पूर्ण केलं. मात्र, या भाषणात त्यांनी आपल्या सुरुवातीच्या उल्लेखामध्ये कोणतीही दुरुस्ती केली नाही.

“मला पंतप्रधानांनीही विचारलं, कहाँ है चलानेवाले!”

यावेळी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांसमवेत नागपूर ते शिर्डी चार तासात केलेल्या प्रवासाचा अनुभवही सांगितला. “देवेंद्र फडणवीसांच्या संकल्पनेतून समृद्धी महामार्ग सुरू झाला. एमएसआरडीसीचा मंत्री म्हणून भाग्य लाभलं. आम्ही त्या रस्त्यावर जाऊन आलो. १८ तासांचं अंतर ६-७ तासांवर आलं आहे. आम्ही नागपूरहून शिर्डीपर्यंत चार तासांत आलो. मला माहिती नव्हतं तुमची एवढी सुंदर ड्रायव्हिंग आहे. सुरुवातीला मला थोडी भीती वाटली. पण चार तासांत आपण ते अंतर पार केलं. याची दखल खुद्द पंतप्रधानांनी घेतली. मला त्यांनी काल विचारलं, कहाँ है चलाने वाले”, असं म्हणून एकनाथ शिंदेंनी कार ड्रायव्हिंगची अॅक्शनही करून दाखवली!

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 17:40 IST
Next Story
मुंबई : कांदिवलीमध्ये घरफोडी; १४ लाखांचा मुद्देमाल लूटला