eknath shinde camp dussehra rally in bkc uddhav thackeray dussehra rally in shivaji park zws 70 | Loksatta

दसरा मेळाव्याचा आखाडा ; शक्तिप्रदर्शनासाठी सज्जता: शिवाजी पार्क, बीकेसीकडे सर्वाचे लक्ष

उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पारंपारिक पद्धतीने होणार असला तरी टीकेचा प्रमुख रोख शिंदे गट आणि भाजपवर असणार आहे

दसरा मेळाव्याचा आखाडा ; शक्तिप्रदर्शनासाठी सज्जता: शिवाजी पार्क, बीकेसीकडे सर्वाचे लक्ष
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर आज होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दोन्ही मेळाव्यांसाठी गर्दी जमविण्यावर भर देण्यात आला असून, या मेळाव्यांत उभय बाजूने आरोपांच्या तोफा धडाडणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात होईल. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे- कुर्ला संकुलात होणार आहे. गर्दी जमविण्यासाठी उभय बाजूने संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. विशेषत: शिंदे गटाने शिवसेनेपेक्षा मोठी सभा व्हावी, यासाठी जोर लावला आहे.

शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलात दसरा मेळाव्याची जोरदार तयारी केली असून, राज्यभरातून चार-पाच हजार एसटी, खासगी बसगाडय़ा आणि हजारो खासगी वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. मैदानात लाखभराहून अधिक खुर्च्याची व्यवस्था असून, आणखी हजारो कार्यकर्ते बाजूच्या मैदानांवर आणि परिसरात असतील. त्यांच्या खाण्यापिण्याची, वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेनेनेही शिवाजी पार्कमधील दसरा मेळावा नेहमीप्रमाणे यशस्वी व्हावा, यासाठी जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे.

उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पारंपारिक पद्धतीने होणार असला तरी टीकेचा प्रमुख रोख शिंदे गट आणि भाजपवर असणार आहे. गद्दारांना निवडणुकांमध्ये धडा शिकवा, याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवरही टीकेचा भडिमार होण्याचे संकेत आहेत. गरिबी, बेरोजगारी आणि विषमता यांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावरूनही केंद्राला धारेवर धरले जाईल, असे चित्र आहे.

‘‘मेळाव्यासाठी आमची जय्यत तयारी असून, हजारो कार्यकर्ते मैदानात व बाहेरही असतील. राज्यभरातून कार्यकर्ते निघण्यास सुरूवात झाली असून, त्यांचा नवी मुंबई व चेंबूरमध्ये मुक्काम आहे. आम्हाला वाहनांची किंवा बसगाडय़ांची व्यवस्था करावी लागली नाही. कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने येत आहेत’’, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. शिंदे गटाने एसटी बसगाडय़ांसाठी कोटय़वधी रुपये रोख रक्कम कुठून गोळा केली, यावरही शिवसेना नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

उद्धव यांच्यानंतरच शिंदे यांचे भाषण?

दोन्ही गटांचे मेळावे सायंकाळीच होणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकाटिप्पणी करण्याची संधी सोडणार नाहीत. यामुळेच ठाकरे यांच्यानंतर शिंदे यांचे भाषण होईल आणि त्यात ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची शिंदे गटाची योजना आहे. परंतु, ठाकरे यांनीही उशिरा भाषणाला सुरुवात केल्यास ठाकरे आणि शिंदे या दोघांचे भाषण एकाच वेळी होऊ शकते. शिंदे गटातील अनेक आमदार-खासदार हे शिवसेनेतील आपल्या अनुभवांचे कथन करून ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करणार असल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख?

खरी शिवसेना कोणाची, यावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढील सुनावणीसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. विधिमंडळ गटनेते पदाबरोबरच पक्षाची सूत्रेही आपल्याकडेच आहेत आणि विधिमंडळ पक्षाबरोबरच संघटनेतील महत्वाचे पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत, हे शिंदे यांच्याकडून आयोगापुढे मांडले जाणार आहे. कायदेशीर मुद्दा येऊ नये म्हणूनच शिवसेनेचे पक्षप्रमुखपद शिंदे यांची निवड केली जाणार आहे. खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाकडे राहणार, या मुद्दय़ावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे व शिंदे गटाला ७ ऑक्टोबपर्यंत कागदपत्रे व पुरावे सादर करण्यासाठी आयोगाने मुदत दिली आहे. विधिमंडळातील किती आमदार व लोकसभेतील खासदार बरोबर आहेत, त्यांच्या पाठिंब्याची पत्रे आणि लोकसभा अध्यक्ष व विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या गटाला मान्यता दिल्याची पत्रे शिंदे यांनी सादर केली आहेत. पण संघटनेतील बहुसंख्य पदाधिकारी बरोबर असल्याचे पुरावे शिंदे यांना द्यावे लागणार आहेत. शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीत २०१८ ते २०२३ या कालावधीसाठी उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी निवड केल्याची कागदपत्रे आयोगास सादर करण्यात आली आहेत. शिवसेनेवर हक्क सांगायचा असेल, तर ठाकरे यांना दूर करून पक्षप्रमुखपदावर शिंदे यांना दावा करावा लागणार आहे. त्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक किंवा अधिवेशन घेण्यात आले आणि शिंदे हे पक्षप्रमुख निवडले गेले, हे शिंदे यांना दाखवावे लागणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटातील राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी, जिल्हा, तालुका प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वाच्या पाठिंब्याने शिंदे हेच पक्षाचे प्रमुख असल्याचे आयोगापुढे सिध्द केले जाणार आहे. त्यादृष्टीने शिंदे यांची पक्षप्रमुख निवड बुधवारी करावी, असा विचार असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. आयोगापुढे शपथपत्र सादर करून तसा दावा करता येईल. पण, बहुसंख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड झाली, हे दाखवून देण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया पार पाडण्याचा विचार करण्यात येत आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना संघटनेवरही ताबा किंवा सूत्रे हाती घेतल्याचे दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे संबंधितांनी सांगितले.

शिंदे गटात कोण प्रवेश करणार?

दसरा मेळाव्यात शिवसेनेचे काही आमदार आणि काही बडे पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. यानुसार कोण प्रवेश करणार, याची उत्सुकता आहे. शिवसेनेचे मुंबईतील काही माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करतील, असेही सांगण्यात येते.

वाहतूक कोंडीची भीती

शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कमध्ये असल्याने दादपर्यंत वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलात असून, या मेळाव्याला मुंबईबाहेरून अधिक गर्दी होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, वाशी खाडी पुलापासून मुंबईच्या सीमेवर वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गरिबांना दिवाळीसाठी १०० रुपयांत शिधा ; प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, एक लिटर पामतेल

संबंधित बातम्या

गुजरात निवडणुकीसाठी जाणे हे अधिकृत काम आहे का?; न्यायालयाचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना खडे बोल
राज ठाकरेंचे डॅमेज कंट्रोल; पुणे, नाशिकमधील नगरसेवकांशी संवाद साधणार
गृहनिर्माण मंत्र्यांचे अधिकार म्हाडाला
मुंबई: गोवरबाबत रॅपरच्या माध्यमातून जनजागृती; सामाजिक संस्थांचा मदतीचा हात
प्रत्युषाच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Smartphone Tips and Tricks: तुम्हालाही स्मार्टफोनमध्ये खाजगी फोटो, व्हिडीओ लपवायचे आहे? ‘या’ सोप्या पद्धतीने तयार करा ‘हिडन फोल्डर’
FIFA World Cup 2022; इंग्लंड-वेल्सचे चाहते एकमेकांसोबत भिडले; खुर्च्या आणि लाथांनी केली मारहाण, पाहा व्हिडिओ
“मन भरलं म्हणून…” घटस्फोटाच्या चर्चांवरुन ट्रोल करणाऱ्यांना मानसी नाईकचे सडेतोड उत्तर
Viral Video: चक्क चालत चालत त्याने पार्क केला ट्रक; व्हिडीओ पाहून नेटकरी पडले बुचकळ्यात
पुणे: कांदा, टोमॅटो, फ्लाॅवर, कोबी, घेवड्याच्या दरात घट