scorecardresearch

“ठेकेदारांसाठी काम काढलं असं लोकांनी…”, एकनाथ शिंदेंचं रस्त्यांच्या निकृष्ट कामावरून वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्त्यांवरून ठेकेदारांना फैलावर घेतलेले दिसलं. काही ठिकाणी रस्त्यांवरील डांबर हाताने निघत असल्याचं नमूद केलं.

“ठेकेदारांसाठी काम काढलं असं लोकांनी…”, एकनाथ शिंदेंचं रस्त्यांच्या निकृष्ट कामावरून वक्तव्य
एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्त्यांवरून ठेकेदारांना फैलावर घेतलेले दिसलं. काही ठिकाणी रस्त्यांवरील डांबर हाताने निघत असल्याचं नमूद करत ठेकेदारासाठी काम काढलं असं लोकांनी म्हणायला नको, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. तसेच ४५० किलोमीटर रस्ते काँक्रिटचे करणार असल्याचं म्हणत त्यांनी पुढील दोन वर्षात मुंबईत एकही खड्ड दिसणार नाही, अशी घोषणाही केली. ते शुक्रवारी (३० सप्टेंबर) मुंबई येथे आयोजित ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०’ शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “काही ठिकाणी व्हिडीओ येतात. त्यात लोकं रस्त्यावरील डांबर हाताने काढून दाखवतात. असं काम आपण कसं सहन करू शकतो. त्यामुळे सरकारचे जे पैसे जातात त्याचा योग्य वापर झाला पाहिजे.”

आपण ठेकेदारासाठी हे काम काढलं असं लोकांनी म्हणता कामा नये”

“आपण ठेकेदारासाठी हे काम काढलं असं लोकांनी म्हणता कामा नये. जे काम आपण करू ते टिकलं पाहिजे. ही जबाबदारी आपल्या अधिकाऱ्यांची आहे. पैसे देण्याचं काम सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे, पण चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

“मुंबई महानगरपालिकेला पैशांची अडचण आहे का?”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मुंबई महापालिका एवढी मोठी आहे, आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तरी मुंबईत एवढे खड्डे आहेत. याबाबतीत काय निर्णय घेता येईल असं मी बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांना विचारलं. ते म्हणाले आपण दरवर्षी थोडे थोडे काँक्रेटचे रस्ते घेतो. मी म्हटलं, थोडे थोडे का घेतो? पैशांची काही अडचण आहे का? ते म्हटले नाही.”

“यावर्षी ४५० किलोमीटर काँक्रेट रस्त्यांच्या कामाचे आदेश”

“यानंतर मी त्यांना यावर्षी ४५० किलोमीटरचे काँक्रेटचे रस्त्यांचं काम करण्यास सांगितलं आहे. त्यांनी दुसऱ्या दिवशी या कामाच्या टेंडरचं काम सुरू केलं. आता मुंबई महानगरपालिकेने ५,५०० कोटी रुपयांचे काँक्रेट रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती शिंदेंनी दिली.

“मार्चमध्ये मुंबईतील उरलेले सर्व रस्ते काँक्रेटचे होतील”

काँक्रेट रस्त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुंबईसाठी आपल्याला काम केलं पाहिजे, मुंबईचा चेहरामोहरा बदलला पाहिजे असं म्हटलं. शांघाय बिंगाय जाऊ द्या, पण आपण स्वच्छ आणि सुंदर मुंबई करू शकू. त्याची सुरुवात झाली आहे. येत्या मार्चमध्ये मुंबईतील उरलेले सर्व रस्ते काँक्रेटचे होतील यासाठी काम सुरू आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षात मुंबईत एकही खड्डा बघायला मिळणार नाही.”

व्हिडीओ पाहा :

“असं कुठंही खपवून घेतलं जाणार नाही”

“प्रकल्प मंजूर होतात, पण ते पूर्ण होत नाहीत. एखादा ठेकेदार एकदम बिनकामाचा निघतो. त्यामध्येही काही गोष्टी अव्यवहार्य झालेल्या असतात. त्याचा फटका शहरांना बसतो. असं कुठंही खपवून घेतलं जाणार नाही. जे रस्ते बांधतो किंवा दुरुस्त करतो ते काम गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे. ती शेवटी आपली जबाबदारी आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर

“गटारात गुदमरून एकही मृत्यू होता कामा नये”

शिंदेंनी यावेळी गटार सफाईत गुदमरून होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मॅनहोलसाठी रोबोटचं मी उद्घाटन केलं होतं. मॅनहोलमध्ये अनेक कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू होतो. रोबोटमुळे आपण हे टाळू शकतो. सगळ्या नगरपालिकांना त्यासाठी आर्थिक मदत केली जाईल. हे मशीन आपण देण्याची आवश्यकता आहे. गुदमरून एकही मृत्यू होता कामा नये. ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे.”

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या