मुंबई : ब्रिटनच्या संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिंदे यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात करत महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका मांडली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली. नागरिककेंद्री आणि लोककल्याणकारी योजनांची दखल घेत हा सन्मान देण्यात आल्याचे आयोजकांच्या मानपत्रात नमूद करण्यात आले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचविणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांचा पुरस्कारासाठी विशेष उल्लेख करण्यात आला.
आपल्या कुटुंबाच्या कष्टांचा उल्लेख करताना शिंदे यांनी आई आणि पत्नीला दिवसरात्र कष्ट करताना पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणींची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘मला माझी एक बहीण आहे, मात्र लाडकी बहीण योजनेमुळे कोट्यवधी बहिणी मिळाल्या. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा परिणाम कुटुंबाच्या आरोग्य, पोषण आणि मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा विचार आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणारे प्रशासन या त्रिसूत्रीवर महाराष्ट्राची विकासयात्रा उभी असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ या सुरेश भट यांच्या कवितेतील ओळी श्रोत्यांना ऐकवत त्यांनी मराठी भाषेचा गौरव केला.
महाराष्ट्र हे देशाचे प्रमुख औद्योगिक आणि आर्थिक केंद्र आहे. राज्याची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक, कौशल्य विकास आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र आणि ब्रिटनमध्ये सहकार्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिटिश उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भारत-ब्रिटन संबंध नव्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. ब्रिटनमधील ७० हजारांहून अधिक महाराष्ट्रीयन नागरिक या दोन देशांमधील महत्त्वाचा मानवी दुवा असल्याचेही त्यांनी नमूद केले. मी मुख्यमंत्री नाही, मी एक सामान्य माणूस आहे, हा मुख्यमंत्रीपदाच्या काळातील दृष्टिकोन आजही कायम असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
