मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने काढलेल्या मोर्चावर शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न हा न्यायव्यवस्थेवरील आघात असून, देशाच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याची टीका शिंदे यांनी केली. या घटनेचा शिवसेनेच्या वतीने निषेध करत राहुल गांधी यांनी देशातील १४० कोटी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
भारतीय संविधानाने देशात न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या घटनात्मक संस्था उभ्या केल्या आहेत. त्याच संविधानाचे पुस्तक हातात घेऊन संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही, असे शिंदे म्हणाले. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे. न्याय मागताना घटनात्मक संस्थांच्या प्रतिष्ठेचे भान राखणे आवश्यक आहे. एखाद्या विषयावर आक्षेप असल्यास सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागता येते. त्यामुळे रस्त्यावर उतरून न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय इतिहासात यापूर्वी अशा प्रकारची घटना यापूर्वी घडलेली नाही असे शिंदे यांनी सांगितले. हे आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांचा आपण आणि आपला पक्ष निषेध करत असल्याचे ते म्हणाले. संविधानाच्या संरक्षणाची भूमिका मांडणाऱ्या राहुल गांधी यांनी घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेचाही आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरही आंदोलन करण्यात आले होते, याची आठवण करून देत त्यांनी विरोधकांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
या आंदोलनामुळे देशातील अस्थिरतेला खतपाणी मिळू शकते आणि परकीय शक्तींना बळ मिळण्याची शक्यता आहे, असा दावाही शिंदे यांनी केला. देशाला अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. या घडामोडींमागे आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा भाग असल्याचे मानले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा आणि न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेचा आदर राखला गेला पाहिजे, असे सांगत शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेवर टीका केली. संविधानाचे नाव घेऊन त्याच संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे दुर्दैवी आणि घातक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणी राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली.
