मुंबई: मंत्रिमंडळ बैठकीना काही वेळा मारण्यात येणारी दांडी. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या नगरविकास विभागाच्या बैठका, विधानपरिषद निवडणुकीत पुण्यातून घ्यावी लागलेली माघार, दुष्काळाच्या बैठकीला न दिलेले निमंत्रण अशा अनेक कारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीचा सूर पुन्हा आळवला जात असल्याची चर्चा आहे.

कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. हा विषय नगरविकास विभागाच्या अख्यत्यारीतील होता. शिंदे यांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या वर्षा निवासस्थानी जाणे टाळले. त्याचवेळी त्यांच्या नंदनवन बंगल्यावर इंडिया आघाडीने सोमवारी केलेल्या दिल्लीतील आंदोलनाचा निषेध करणारी पत्रकार परिषद घेतली.

रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय पथकासोबत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. या बैठकीला शिंदे यांना बोलावण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वय अपेक्षित आहे. शिंदे नाराज असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये पुणे विधानपरिषदेवरुन नाराजी आहे.