मुंबई : पक्षाच्या नावावरूनही शिवसेना उद्धव ठाकरे गटाची कोंडी करण्याची खेळी शिंदे गटाने केली आहे. शिंदे गटाच्या वतीनेही शिवसेनेने मागणी केलेली बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित दोन नावांवर दावा करण्यात येणार आहे.

शिवसेनेने शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तीन नावांचा पर्याय निवडणूक आयोगाला सादर केला आहे. शिंदे गटाने शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे) ही दोन नावे निश्चित केली आहे. तिसरे नाव सोमवारी सकाळी अंतिम करण्यात येणार आहे. शिवसेनेला काहीही करून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मिळू नये, असा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. शिंदे गटाने सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असा दावा केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव शिवसेनेला वापरण्यास मिळाल्यास तो शिंदे गटाला त्रासदायकच ठरेल.  शिवसेनेने निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त होताच लगेचच  तीन नावे व चिन्हांची यादी सादर केली. शिंदे गट बाळासाहेबाांचे नाव वापरणार याचा शिवसेना नेत्यांना अंदाज होता. म्हणूनच शिवसेनेने पहिला दावा आमचा आहे हे दाखविण्याकरिता शनिवारी रात्रीच यादी सादर केली होती. दोन्ही गटांनी एकाच नावावर दावा केल्यास दोन्ही गटांना ते नाव मिळणार नाही, अशी शिंदे गटाची योजना आहे.

शिंदे गटाची चिन्हे

तुतारी, गदा, तलवार या तीनपैकी एक चिन्ह मिळावे, अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या वतीने सोमवारी सकाळी पक्षाची नावे व चिन्हांबाबतचे पत्र सादर करण्यात येणार आहे.