मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर आज दुपारी भरकटले. मात्र हेलिकॉप्टरच्या पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने ते वळवून जुहू पवनहंस येथे आणून त्याचे यशस्वीपणे लँडिंग करण्यात आले. या घटनेत कुणालाही कोणतीही इजा झाली नसून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासहित हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील लग्नकार्यासाठी मुंबईहून मुरबाड जाण्यासाठी निघाले होते. दुपारी ३.३० वाजता महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅड वरून मुरबाड जाण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. मात्र हेलिकॉप्टर जेमतेम ऐरोलीपर्यंत पोहोचताच समोरून येणारे वादळ पायलटने पहिले. संभाव्य धोका ओळखून पायलटने वेळीच याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांना अवगत केले. तसेच पुढे जाण्याऐवजी मागे वळावे लागेल असेही सांगितले. त्यानंतर त्याने तत्काळ हे हेलिकॉप्टर मागे वळवण्याचा निर्णय घेतला.  पुढील काही मिनिटात हे हेलिकॉप्टर जुहू येथील पवनहंस येथे यशस्वी लँड झाले.

यावेळी या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, विशेष कार्य अधिकारी बालसिंह राजपूत, जनसंपर्क विभागाचे विशेष कार्य अधिकारी विनायक पात्रुडकर आणि सुरक्षा रक्षक तसेच विमान कंपनीचे प्रतिनिधी होते. हेलिकॉप्टरचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर हे सर्वजण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत.