मुंबई: शिवसेना मुख्य नेता व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भेट घेतल्याने अनेक तर्क विर्तक लावले जात आहेत. राज्यातील दोन राष्ट्रवादी पक्षांचे एकीकरण होणार असून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वाटयाचे अर्थमंत्री पद मिळणार आहे. त्यावरुन शिंदे नंतर नाराज होऊ नयेत यासाठी त्यांना पूर्व कल्पना देण्यासाठी पाटील यांनी शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे.
केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन २० जुलै पासून सुरु होत आहे. मागील अधिवेशनात नामंजूर झालेले नारी शक्ती विधेयक या अधिवेशनात मंजूर करुन घेण्याचा इरादा भाजप सरकारचा आहे. त्यासाठी संसदेत उपस्थित खासदारांच्या दोन तृतीअंश खासदारांची जुळवाजुळव सुरु आहे. पश्चिम बंगाल मधील तृणूमूल काँग्रेस, दिल्लीतील आप, महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे पक्ष, तमिलनाडू मधील डीएमके यासाख्या पक्षांचे खासदार सरकारकडे वळविण्यात सत्ताधारी पक्षाला यश आले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राज्यात सात खासदार आहेत. त्यांचा पाठिंबा मिळाल्यास संसदेतील बहुमत आणखी मजबूत होणार आहे. विरोधकांचे खासदार या विधेयकाच्या निमित्ताने आपल्याकडे वळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
या पाठिंब्याच्या बदल्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला केंद्रात आणि राज्यात प्रतिनिधीत्व दिले जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडे असलेले अर्थमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतकडे ठेवले आहे. हे मंत्रीपद दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जयंत पाटील यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी पाटील मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना ही कल्पना देत असल्याची राजकीय चर्चा सुरु आहे.
