मुंबईः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यातील मैत्री आणि राजकीय सबंधाचा प्रवास नेहमीच रंजक आणि आदरयुक्त राहिलेला आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन सुरु झालेल्या मराठा आंदोलनाविरोधात वेळोवेळी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भुजबळ यांना मुख्यमंत्री असतानाही शिंदे यांनी भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत असे सांगत संयमाची भूमिका घेतल्याचे चित्र अनेकदा दिसून आले आहे. याच आपल्या लाडक्या सहकारी- मित्रासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थेट लंडनहून आणलेल्या अनोख्या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलेली आहे.

भुजबळ आणि शिंदे यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतच घडली. भुजबळ हे शिंदे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते असले तरी १९८६ मध्ये बेळगावमधील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शिवसेनेने केलेल्या तीव्र आंदोलनात हे दोन्ही नेते सहभागी झाले होते. त्यावेळी भुजबळ यांनी कर्नाटक पोलिसांना चकवा देण्यासाठी वेशांतर करून बेळगावात प्रवेश केला होता आणि आंदोलन यशस्वी केले होते. भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास १०० शिवसैनिक महाराष्ट्रातून बेळगावला गेले होते. तिथे झालेल्या लाठीमारात ते जखमी झाले आणि त्यानंतर त्यांना तब्बल ४० दिवस बेल्लारी (कर्नाटक) येथील मध्यवर्ती कारागृहात काढावे लागले होते. मात्र भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिंदे आणि भुजबळ यांच्यात कटुता निर्माण झाली होती. कालांतराने महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदे याणि भुजबळ पुन्हा एकदा मांडीला मांडी लावून एकाच सरकारमध्ये काम करताना दिसले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळातही दोन्ही नेत्यांमधील सबंध ताणले गेल्याचे आणि राजकीय मतभेद वाढल्याचे पाहयला मिळाले होते. आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यातील संघर्ष पेटल्यानंतर भुजबळ यांनी मराठा आंदोलनाविरोधात उघडपणे दंड थोपटले. एकीकडे भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आंदोलनावरुन तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त करीत आक्रमक भूमिका घेतलेली असतानाही शिंदे यांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेत भुजबळ हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर केले जातील आणि ओबीसींवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे सांगत नेहमी वैयक्तिक मैत्री आणि आदर जपला आहे.

आजही या दोन्ही नेत्यांमध्ये दोघांच्याही राजकीय पक्षांची भूमिका आणि राजकीय मुद्द्यांवरून कितीही मतभेद झाले, तरी एकमेकांचा संघर्ष जवळून पाहिलेले जुने सहकारी म्हणून त्यांच्यात एक सुजाण राजकीय मैत्री टिकून असल्याचे प्रत्यंतर नुकतेच आले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नुकताच लंडन दौरा केला. इंग्लंडच्या संसदेत त्यांचा काॅमनवेल्थ पब्लिक लिडरशीप रेकगनेशन, स्टेटमनशीप अवाॅर्ड तसेच ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र ॲवाॅर्डने सन्मान करण्यात आला. लंडनमधील आपल्या व्यक्त कार्यक्रमातून वेळ काढीत शिंदे यांनी कुटुंबियांप्रमाणेच आठवणीने आपल्या लाडक्या मित्रासाठीही एक खास भेट आणली.

भुजबळ यांचे मफलर प्रेम सर्वश्रूत आहे. सदैव गळ्यात मफरल घालणारे भुजबळ आपल्या सहकारी- मित्रांनाही मफलर देताना दिसतात. भुजबळांचे हे मफलर प्रेम पाहून त्यांच्यासाठी शिंदे यांनी थेट लंडनहून दोन खास मफलरी आणल्या आणि त्या भुजबळांना प्रेमपूर्वक भेट दिल्या. शिंदे यांच्या या अनोख्या भेटीने भारावलेल्या भुजबळ यांनी ही दोन्ही मफलर गळ्यात घालताना झालेल्या आनंदाबदद्ल शिंदे यांचे आभार मानले. माझी आवड लक्षात ठेवून आपण केलेला हा आपुलकीचा विचार आणि जिव्हाळ्याची भेट आपल्यासाठी अत्यंत मोलाची आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून एवढ्या आत्मीयतेने भेट दिल्याबद्दल शिंदे यांचे आभार मानतानाच या प्रेमळ आठवणीची मला सदैव जपणूक राहील अशी ग्वाहीही भुजबळ यांनी पत्राद्वारे दिली आहे.