मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ब्रिटिश संसदेतील दोन स्वतंत्र कार्यक्रमांमध्ये तीन पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’, तर ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘स्टेटसमनशिप अवॉर्ड’ने त्यांना गौरविण्यात येणार आहे. याशिवाय लंडनमधील महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांना ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ हा सन्मान दिला जाणार आहे. या दोन दिवसीय दौऱ्यासाठी शिंदे बुधवारी लंडनला रवाना झाले.

यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी राबविलेल्या नागरिककेंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासनाची दखल घेत हा सन्मान देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, नागरिकांना शासकीय सेवा थेट उपलब्ध करून देणे आणि तरुणांना रोजगाराचा प्रत्यक्ष अनुभव देणे या क्षेत्रातील योजनांचा या सन्मानासाठी विशेष उल्लेख करण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ या तीन योजनांचा त्यात समावेश आहे.

दरम्यान, १० सप्टेंबरला ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६ : ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉग’ होणार आहे. इंडो-युरोपियन बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरमच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या परिषदेस शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांना ‘स्टेटसमनशिप अवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार आहे.

या परिषदेत शिंदे महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन तसेच भारत-ब्रिटन आर्थिक संबंधांबाबत भूमिका मांडणार आहेत. महाराष्ट्रातील नगरविकास, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांमधील कामगिरीचाही यावेळी विशेष उल्लेख होणार आहे. ब्रिटिश संसद सदस्य, वरिष्ठ मंत्री, महापौर, राजदूत आणि जागतिक उद्योजकांची या परिषदेला उपस्थिती अपेक्षित आहे.

लंडनच्या महाराष्ट्र मंडळातर्फे ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’

लंडनमधील ९४ वर्षे जुन्या महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र भवनालाही शिंदे भेट देणार आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’सह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मंडळातर्फे त्यांना ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.