मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे लंडन दौऱ्यावरुन रविवारी पहाटे मुंबईत परतले, पण त्यांचा भ्रमणध्वनी चक्क विमानात विसरला. घरी पोचल्यावर आपला भ्रमणध्वनी नसल्याचे त्यांचे लक्षात आले. विसरलेला भ्रमणध्वनी विमानतळावर घेण्यासाठी पोलीसांना तातडीने पाठवण्यात आले. बरीच धावाधाव करुन पोलीसांनी पहाटे चार वाजता शिंदे यांना गहाळ झालेला भ्रमणध्वनी आणून दिला.
५ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या खास सहकाऱ्यांसह आठवड्याच्या लंडनच्या दौऱ्यावर निघाले. ब्रिटीश संसदेच्या ‘हाऊस ऑफ लॉर्डस’मध्ये ‘कॉमनवेल्थ लिडरशीप रेकग्नेशन’, ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘स्टेटसमनशिप’ ॲवार्ड आणि महाराष्ट्र मंडळाच्या वतीने ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ असे तीन पुरस्कार शिंदे यांना मोठ्या थाटात प्रदान करण्यात आले. साहेबांचे लंडन पाहून, क्रीकेटपटू विराट कोहली यांची भेट घेऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवास केलेल्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आणि लंडनच्या रस्त्यावर वडा पावचा आस्वाद घेऊन शिंदे १२ सप्टेंबर रोजी मुंबईत परतले.
दोन्ही वेळी त्यांचा ‘ब्रिटीश एअरवेज’ने प्रवास झाला. जाताना स्वित्झर्लंडमध्ये झुरीच येथे थांबा होता. येताना मात्र सलग नऊ तासाचा विमान प्रवास झाला. लंडन हे भारतीय प्रमाण वेळेच्या साडेचार तास मागे आहे. पहाटे २ वाजता शिंदे यांचे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. शिंदे यांच्या स्वागताला प्रकाश सुर्वे, मुरजी पटेल आणि तुकाराम काते हे शिवसेनेचे आमदार आपल्या कार्यकर्त्यांसह हजर होते. दूरचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधीही होते. त्यामुळे विमानातून उतरल्यानंतर हारतुरे स्वीकारण्यात आणि वाहिन्यांना पुरस्काराची माहिती देण्यात शिंदे यांचा बराच वेळ गेला.
व्हिडीओ कॉलवर अधिक बोलणे होत असल्यामुळे शिंदे ‘ॲपल’चा भ्रमणध्वनी वापरतात. सभा असतात तेव्हा तो स्वीय सहायकाकडे देतात, इतर वेळी त्यांच्याकडेच असतो. परतीच्या प्रवासात शिंदे यांच्या अंगावर ब्लेझर होता. घरी पोचल्यानंतर पहाटे तीन वाजता भ्रमणध्वनी नसल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. सुरक्षेवरील पोलीसांना लागलीच तशी माहिती देण्यात आली.
विमानतळावरील ‘ब्रिटीश एअरवेज’च्या सुरक्षा कार्यालयाशी पोलीसांकडून संपर्क साधण्यात आला. प्रवासी उतरल्यानंतर विमान कंपनीच्या सुरक्षा विभागाकडून विमानाची तपासणी होते. परंतु, काही वेळेस प्रवाशांची वस्तू छोटी असल्यास सुरक्षा रक्षकांच्या नजरेतून सुटते. अशा वेळी त्या वस्तू विमानामध्ये राहतात आणि त्या मिळण्यास काही दिवसांपर्यंत विलंब होऊ शकतो.
अखेर बरीच धावाधाव करुन पहाटे पाच वाजता शिंदे यांच्याकडे पोलिसांनी भ्रमणध्वनी पोचवला. भ्रमणध्वनी हाती येईपर्यंत शिंदे घरी जागेच होते. शिंदे मुख्यमंत्री असतानाही त्यांचा भ्रमणध्वनी गहाळ झाला होता. तो मिळालाही. पण, यावेळी विमानात आणि तोसुद्धा ‘ब्रिटीश एअरवेज’मध्ये विसरल्याने यंत्रणांना धावाधाव करावी लागली.
