मुंबई : येत्या काळात मुंबई बांगलादेशी घुसखोर आणि अमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला असून त्यासाठीचा कृती आराखडाही तयार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली. बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.

या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ साठी वाढीव मागणीसह ८१३ कोटी ३५ लाख ७२ हजार रकमेच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ७८५.३५ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना २८ कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी ७२ हजार इतक्या रकमेचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून होणारी विकासकामे विहित कालमर्यादेत, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करावीत. यासाठी कार्यान्वयीन यंत्रणांनी, टीम वर्कने मंजूर निधी विहित कालावधीत १०० टक्के खर्च करावा, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. तसेच ज्या यंत्रणा त्यांचा मंजूर निधी व कामे विहित कालावधीत पूर्ण करणार नाहीत अशा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, प्रसाद लाड, मनीषा कायंदे, चित्रा वाघ, अजय चौधरी, अमीन पटेल, महेश सावंत, मनोज जामसुतकर, शिवाजीराव गर्जे, जगन्नाथ अभ्यंकर, ज्योती गायकवाड, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे आदी उपस्थित होते.