मुंबई : शिवसेनेचा १९ जून रोजी ५८ वा वर्धापन दिन असून त्याच्या तयारीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी पक्षाचे मंत्री, आमदार आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर, कोकण, ठाणे, पालघर हे पक्षाचे बालेकिल्ले अभेद्या राखल्याबद्दल उपस्थितांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. आता पूर्ण ताकदीने विधानसभेच्या तयारीला लागा, अशी सूचना शिंदे यांनी यावेळी केली.

लोकसभा निवडणुकीत आपला विजयाचा दर विरोधी गटापेक्षा अधिक राहिला. त्यांनी २२ जागा लढवून ९ जिंकल्या, आपण १५ जागा लढवून ७ जिंकल्या आहेत. त्यांचा विजयी दर ४२ टक्के, तर आपला ४८ टक्के आहे. मुंबईत त्यांच्यापेक्षा आपल्याला २ लाख जास्त मते मिळाली आहेत. जनता आपल्याला साथ देत आहे. विरोधकांनी या निवडणुकीत खोट्या कथानकाचा प्रचार करत जनतेची दिशाभूल केली. त्यांनी दिशाभूल करत मते मिळवली आहेत. या खोट्या कथानकाचा विधानसभेला वापर होऊ नये, यासाठी सजग राहा, असे शिंदे यांनी बजावले.

हेही वाचा >>>“अमोल किर्तीकरांचा पराभव EVM नव्हे, तर पोस्टल मतांमुळे झाला”, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; मांडलं मतांचं गणित!

आषाढी वारी, दहीहंडी, गणपती, दसरा, दिवाळी असे हिंदूंचे सण उत्साहात साजरे करा. वारीला निघणाऱ्या पालख्यांचे पक्षाच्या वतीने जागोजागी स्वागत करा. दिंड्यांची सोय करा, असेही आदेश त्यांनी दिले. तसेच गावागावांत, वाडी – वस्तीवर शिवसेनेचे फलक लावा. सर्वत्र शिवसेनेच्या शाखा सुरू करा, असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळचा पक्षाचा वर्धापन दिन गोरेगाव येथे होणार आहे. त्याला किमान २० हजार शिवसैनिकांना आणा, असे आदेश शिंदे यांनी दिले.

राज्यातील काही भागांतील यंदा तापमान ५० अंशांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे सर्व जिल्ह्यांत शासनाकडून वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक लाख वृक्ष लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. अशीच मोहीम पक्षाच्या वतीनेसुद्धा राबवा. या मोहिमेअंतर्गत पक्षाच्या वतीने रोपे देण्यात येतील, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.