डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज मुख्यंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील चैत्यभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी बोलताना बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच सामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊन देशाची सेवा करू शकतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच माझ्यासारखी सामान्य कुटुंबातील व्यक्ती आज मुख्यमंत्री होऊ शकली, अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आज महापरिनिर्वाण दिनामित्त मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज आपण केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच जगामध्ये ताठ मानेने उभे आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे सर्वसामान्यांना अधिकार प्राप्त झाले. त्यांना जगण्याचा हक्क मिळाला. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊ शकला. राज्यातही माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकली. मला राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झाले. मी बाबासाहेबांचा शतश: ऋणी आहे. आंबेडकरांनी देशाला, समाजाला दिशा दिली. त्यांनी दुर्बलांना सशक्त करण्याचे काम केले. सामान्य माणूस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. मानवमुक्ती हेच त्याचे धेय्य होते. त्यांनी भारतातीलच नव्हे तर जगभरातील वंचितांच्या हक्कांना, मानवी प्रतिष्ठेला वैचारिक आणि संघटनात्मक बळ दिले. दलित समाजात रुजलेली न्यूनगंडाची भावान काढून टाकली. त्यांनी संघटित होण्यास बळ दिले. शिका संघटित व्हा, असा मूलमंत्र त्यांनी दिला,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> “जर हिंदू असतील तर…” कुराण, इस्लामचा संदर्भ देत सुषमा अंधारेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल!

“इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. आम्ही या स्मारकाला भेट दिली. कामाचा आढावा घेतला. मी मुख्यमंत्री झालो. सरकार स्थापन केले. त्यानंतर मी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. बाबासाहेबांनी जो विचार दिला, जो मार्ग दाखवला त्यावरच आमचे सरकार चालेल असा मी निर्धार केला. डॉ. बाबासाहेब यांचे वास्तव्य असेलेल्या राजगृह या वास्तुलाही मी भेट दिली. ती वास्तू ऐतिहासिक ठेवा आहे. बाबासाहेबांच्या वापरातील अनेक वस्तू, छायाचित्र, त्यांच्या अभ्यासाची खोली या सर्व ऐतिहासिक ठेव्याला जोपासले जाईल. लोअर परेल येथील स्मारकाच्या कामाचीही पाहणी केली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी जपण्याचे काम केले जाईल. आर्थिक, सामाजिक लोकशाही नसेल तर राजकीय लोकशाही यशस्वी होणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,” असेही शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> “हेच त्यांचे देशप्रेम का? राज्यावरील बेगडी प्रेम त्यांच्या…”; मोदी भेटीनंतर CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला! ‘मविआ’च्या मोर्चावरही बोलले

“महाराष्ट्र जोतिराव फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारे आपले राज्य आहे. त्यामुळे सत्तेत आल्यावर आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले. आम्ही शासकीय वसतीगृहांची संख्या वाढवत आहोत. जास्तीत जास्त मुलांना शिष्यवृत्ती कशी मिळेल याकडे आम्ही लक्ष देत आहोत. बार्टीअंतर्गत स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही मदत करत आहोत. हे गोरगरिबांचे सरकार आहे. गेल्या पाच महिन्यात कामगार, शेतकरी, गरीब, दलित, पीडित यांच्या उद्धारासाठी आपल्या सरकारने निर्णय घेतले आहेत. राज्यभारातील लोकांकडून एक वेगळी आपुलकी, जिव्हाळा दाखवला जात आहे,” असेही शिंदे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde said become cm only because of dr babasaheb ambedkar and indian constitution prd
First published on: 06-12-2022 at 09:06 IST