मुंबई: एकसंध शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडलेल्या घटनेला पुढील महिन्यात चार वर्ष पूर्ण होतील. त्या मुहार्तावर शिंदे सेना पुन्हा ठाकरे सेना फोडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. तिला खतपाणी शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या भेटीने मिळाले आहे.

पाटील यांची पत्नी पल्लवी अपघात झाल्याने भांडुप येथील फोर्टिज रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिंदे गेले होते. ही विचारपूस पाटील यांना स्वतःच्या वाहनात न घेता थेट जाऊन पण करता आली असती पण शिंदे यांनी पाटील यांना सह प्रवासी बनवून संभ्रम निर्माण केला. त्याचवेळी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या पेक्षा आपण तत्पर असून त्यांच्या खासदारांची काळजी घेतो हा संदेश पण शिंदे यांनी दिला आहे. ही तर माणुसकी आहे रुग्णालयात भेटण्याची असा खुलासा शिंदे सेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे पण ह्या भेटीची व्हिडिओ फुटेज प्रसिद्ध कशी होतील याची तजवीज करण्यात आली होती असे दिसून येते.

राज्याच्या राजकारणात सध्या नव्या चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय दीना पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात जाऊन संजय दीना पाटील यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. तसेच उद्धव ठाकरे यांनीही संजय दीना पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रकृतीची चौकशी केली. शिवाय मिलिंद नार्वेकर यांनीही रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

शिंदे आणि संजय दीना पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास झाल्याचे समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना अधिकच जोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. या भेटीमागे केवळ शिष्टाचार आहे की राजकीय हालचालींचा भाग आहे याबाबत स्पष्टता नसली तरी राज्यातील राजकारणात या घटनेची जोरदार चर्चा रंगत आहे.

या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी “हा प्रसंग मानवी भावनेतून घडलेला आहे. संजय दीना पाटील यांच्या पत्नीच्या अपघातानंतर त्यांना मदत करण्यासाठीच ते शिंदे यांच्या गाडीत बसले होते. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही,” असे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले. तसेच, “एकनाथ शिंदे हे संवेदनशील नेतृत्व आहे. अशा प्रसंगी ते नेहमीच मदतीला धावून येतात. त्यामुळे या घटनेचा राजकीय अर्थ लावण्याची गरज नाही,” असेही त्यांनी नमूद केले. या सर्व घटनांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असले, तरी यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.