मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे मुंबई उत्तर पूर्वे मतदार संघाचे खासदार संजय दिना पाटील यांनी एका गाडीतून प्रवास केल्यान पुन्हा मिशन टायगरच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. शिंदे पक्ष ठाकरे पक्षातील काही खासदार मिशन टायगर नावाने फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा गेली अनेक दिवस रंगली आहे.

संजय दिना पाटील यांनी शिंदे यांच्या गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाटील यांची पत्नी फोर्टिंज रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी शिंदे रुग्णालयात गेल्याचे सांगण्यात आले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडलेल्या घटनेला पुढील महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. शिंदे यांचे सात खासदार आहेत. ठाकरे पक्षाचे खासदार फोडून ही संखा वाढवण्याचा शिंदे पक्षाचा बेत आहे. त्यासाठी ठाकरे पक्षाचे खासदार आपल्याकडे वळविण्याचा शिंदे पक्षाचा सातत्याने प्रयत्न आहे. ठाकरे पक्षाचे काही खासदार शिंदे पक्षाच्या खासदारांकडे दिल्लीत स्नेहभोजनासाठी गेल्याने या चर्चेला उधाण आले होते. मिशन टायगर नावाखाली हा प्रयत्न केला जात आहे. अशी चर्चा सुरु असताना संजय दिना पाटील हे शिंदे यांच्या गाडीतून प्रवास करताना दिसल्याने ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.