मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच वर्षे भटके विमुक्त जाती काटेरी कुंपणात होत्या, ३१ ऑगस्ट १९५२ रोजी त्यांना बंधमुक्त करण्यात आले. सात दशके उलटून गेल्यावरही विमुक्त जातींना जन्मदाखला आणि शिधापत्रिकेसाठी संघर्ष करावा लागणे दुर्दैवी आहे. विमुक्त जातींना त्यांचे हक्क मिळवून देण्यात शिवसेना पुढाकार घेईल, असा शब्द उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिला.

‘विमुक्त दिना’च्या निमित्ताने षण्मुखानंद सभागृहात ‘शिवसेना भटके- विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषदे’चे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने झालेल्या मुंबईतील या पहिल्या मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भटके विमुक्तांच्या ५२ जातींचे हजारो बांधव उपस्थित होते.

राज्यातील दिड कोटी भटके विमुक्तांना संजय राठोड यांच्या रुपाने नेता मिळाला आहे. जगण्यासाठी तुम्ही भटकंती केली. आता स्थिर जीवन जगा. राठोड यांनी स्थापन केलेल्या ‘अखिल भारती शिव भटके -विमुक्त सेने’च्या रुपाने व्यासपीठ लाभले आहे, असे शिंदे म्हणाले. यावेळी ‘शोध भाकरीचा’ माहितीपटाचे सादरीकरण झाले. ‘डीएनटी पोर्टल’ आणि भटके विमुक्त जातींच्या माहिती पुस्तिकेचे शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

तुम्ही मला साथ द्या : मंत्री संजय राठोड

आपले पारंपरिक व्यवसाय मोडीत निघाले आहेत. आमच्यावर अनेक अहवाल झाले पण आमची स्थिती सुधारला नाही. ५२ जातींच्या सामूहीक शक्तीच्या जोरावर आपल्याला भविष्य घडवायचे आहे. आपल्या विकासातील प्रशासकीय अडथळे दूर करण्याचा कार्यक्रम आखला आहे. तुम्ही मला साथ द्या, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आपल्या भाषणात केले. भटके विमुक्तांच्या लोककलेची व हस्तकलेची ओळख होण्यासाठी पर्यटन विभागाकडून मुंबईत महोत्सवाचे आयोजन केले जाईल, असे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई, खासदार ज्योती वाघमारे, राष्ट्रीय ‘डीएनटी’ महासंघाचे अध्यक्ष दिगंबर राठोड, साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांची भाषणे झाली. व्यासपीठावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संजय देशमुख, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार तुकाराम कोते उपस्थित होते. नंदू होनप यांनी पोतराज, मरीआई, वासुदेव, यल्लमा यांची गाणी सादर केली. बंजारा महिलांनी तीज गीते सादर केली. भटके विमुक्तांच्या हस्तकला प्रदर्शनाची पाहणी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.