मुंबईः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अठरा पगड जातींना एकत्र केले, तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठी पदे देऊन बळ दिले. बाळासाहेबांचे स्वप्न आणि विचाराने शिवसेना पुढे जातेय. शिवसेना वाढवण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला न मागता दिले जाते, हे शिवसेनेचे वचन आहे, असे प्रतिपादन शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेनेच्या महिला सेनेकडून शीव येथील षण्मुखानंद सभागृहात ‘शिवदुर्गा सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिंदे बोलत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

ज्योती वाघमारे यांच्या रुपाने लाडकी बहिण राज्यसभेवर जाणार आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली अशा ठिकाणी आरक्षण नसताना महिलांना महापौर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून शिंदे यांनी डॉ. ज्योती वाघमारे यांना दिलेल्या राज्यसभेच्या उमेदवारीचा किस्सा सांगितला. ज्योती वाघमारेंच्या ध्यानीमनी देखील नव्हते की त्या खासदार होतील. लाडकी बहिण योजनेसाठी दिल्लीत कमिटी करायची आहे , असे सांगून त्यांना कागदपत्र तयार करायला सांगितली आणि शेवटच्या दिवशी सही करताना वाघमारेंना समजले की हा राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज आहे, असे शिंदे म्हणाले. शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. व्यक्तिगत इच्छा आकांक्षा, प्रश्न बाजूला सारत पक्षाला वेळ देणारे, जबाबदारी चोखपणे पार पाडणारे जिवाभावाचे कार्यकर्ते आपल्याला लाभले, ते साथ देतात हीच आपली ताकद असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळेच, लाडक्या बहिणींच्या प्रेमामुळेच आज पक्षाला आणि आपल्यालाही राज्यभरात लोकप्रियता मान सन्मान मिळतोय, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

बचत गटांसाठी सरकारने अनेक निर्णय घेतलेत. आरोग्य विभागाने माता सुरक्षित अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ३ कोटी महिलांची आरोग्य तपासणी केली. यात १० हजार महिलांना कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र वेळीच खबरदारी घेतल्याने त्यांचे प्राण वाचवू शकलो, असे ते म्हणाले. आरोग्य आपल्या दारी, माता सुरक्षित कुटुंब सुरक्षित, एचपीव्ही लसीकरण असे उपक्रम राबवले जात आहेत. उद्योग विभागाने आणि डीपीडीसीमधून कोळी महिलांना फूड ट्रक्स दिले. महिला सक्षमीकरणासाठी उद्योग विभागाने आणखी उपक्रम राबवावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी शिवसेनेच्या राज्यसभेच्या उमेदवार ज्योती वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील १० कर्तृत्ववान महिलांचा शिवदुर्गा सन्मानाने गौरव करण्यात आला. यात सोनाली कोचरेकर, स्मिता बामणे, शुभांगी पाटील, डॉ. कांचन बागल, सुजाता कोम्मुवाडे, सुवर्णा साबळे, कोमल तायडे, दिप्ती इडेकर, स्नेहा गुज्जलवार, ॲड.वंदना शेरखाने यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरव करण्यात आला.