मुंबई : अयोध्येत राम मंदिरात जे घडले त्याचे कुणीही समर्थन करणार नाही. परंतु, सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारणे हे हिंदुत्त्व आहे का, अशी विचारणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येच्या प्रश्नावरून रामरक्षा आंदोलन करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला शुक्रवारी विधान परिषदेत लक्ष्य केले. आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सरकारला लक्ष्य करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी चौफेर टोलेबाजी केली.

मान्सूनच्या एका सत्रात होणाऱ्या एकूण पावसाच्या तब्बल २५ टक्के पाऊस अवघ्या आठवडाभरात मुंबईत झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होणे स्वाभाविक होते. विरोधकांनी तथ्य मांडायला हवे होते. त्याऐवजी त्यांनी पावसाचे राजकारण केले, असा आरोप करत त्यांनी विरोधकांची संभावना ‘राजकीय बेडूक’ अशी केली. एखादी दुर्घटना झाली की आमचे सरकार लोकांना वाऱ्यावर सोडत नाही. आम्ही घटनास्थळी जाऊन काम करतो. आम्ही फेसबुक लाईव्हवाले नसून फेस टू फेस काम करणारे आहोत, असा टोला त्यांनी मारला.

परमार्थ हा एकच उद्देश

मुंबईचे प्रश्न सोडविण्याकरिता रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सात एसटीपी प्रकल्प सुरू केले. तुम्ही २५ वर्षात काय केले, असा प्रश्न त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात विश्वासाचे नाते आहे. आम्ही परमार्थ या एकाच उद्देशाने काम करतो, असे सांगत त्यांनी महायुती सरकारच्या काळात मार्गी लागलेल्या प्रकल्पांची जंत्री सादर केली. राम भक्तांना शिव्या देणारे आज रामरक्षा बोलत आहेत. पण सिद्धिविनायकाची दानपेटी लुटणाऱ्यांच्या चौकशीचे आदेश का नाही दिले, अशी विचारणा त्यांनी एका पत्रकार परिषदेचे कात्रण फडकावत केली.

बुद्धीची लिंकच मिसिंग

मिसिंग लिंकवरून शत्रू करणार नाही इतकी महाराष्ट्राची बदनामी करत आहात. या रस्त्याला थोडाही धोका निर्माण झालेला नाही. पण, टीकेची झापडे डोळ्यावर असतील तर सत्यही दिसत नाही. विरोधकांची सदसदविवेक बुद्धीची लिंकच मिसिंग आहे, असे टोला त्यांनी मारला.

अजुनही आमच्याकडे खूप काही

सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे करोनाच्या महामारीत झालेले खिचडी, ऑक्सिजन सिलेंडर, बनावट करोना केंद्रांचे घोटाळे विसरले का, असे सांगत, अजुनही आमच्याकडे खूप काही आहे. ते बाहेर काढायला भाग पाडू नका, अशा इशारा शिंदे यांनी दिला.

स्थगिती नव्हे तर प्रगती सरकार

शिंदे यांनी महसूल, गृह, गृहनिर्माण विभागावर केलेल्या आराेपांचाही यावेळी समाचार घेतला. आमच्या काळात गंभीर गुन्ह्यात घट झाली. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ३.१२ टक्क्यांनी वाढले, असे सांगत त्यांनी, आमचे स्थगिती नव्हे तर प्रगती सरकार असल्याचे विरोधकांना ऐकवले.