शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाईला आजपासून सर्वोेच्च न्यायलायात सुरुवात होणार असून संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर आज सुनावणी होणार असून रविवारपासूनच दोन्ही बाजूच्या पक्षांकडून यासंदर्भातील तयारी सुरु झाली आहे. मात्र या राजकीय घडामोडी आणि न्यायलयीन लढाईच्या तयारीदरम्यान बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंचा फोन काल थेट ‘शिवतिर्थ’वर गेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी शिंदेंनी त्यांना फोन केला होता. तसेच दोन वेळा या नेत्यांमध्ये काल फोन कॉल झाला ज्यामध्ये राजकीय चर्चाही झाल्याची माहिती समोर आलीय.

नक्की वाचा >> ‘…असा आव आणू नका, याची किंमत भविष्यात भाजपाला चुकवावीच लागेल’; बंडखोर आमदारांना ‘नाच्या’ म्हणत शिवसेनेचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना रविवारी फोन केला. राविवारी सायंकाळी एकनाथ शिंदेंनी राज यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिंदे आणि राज यांच्यामध्ये काही मिनिटं प्रकृतीसंदर्भातील चर्चा झाली. राज यांना शनिवारी रुग्णालयामध्ये डिस्चार्ज देण्यात आलाय. शस्त्रक्रियेनंतर राज शनिवारी घरी परतल्याचं त्यांनीच ट्विटरवरुन जाहीर केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी थेट राज यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन प्रकृतीसंदर्भातील माहिती घेतली. तसेच राज यांची या दुखण्यापासून लवकर सुटका व्हावी अशा शुभेच्छाही शिंदेंनी दिल्याचं समजतं. या फोन कॉलदरम्यान शिंदे यांनी राज ठाकरेंना राजकीय घडामोडींसंदर्भातील माहिती देताना आपली बाजूही सांगितल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी म्हटलंय.

नक्की पाहा >> Photos: केंद्रीय मंत्रिमंडळात मुलाला स्थान, RSS चा प्रभाव, खासदारकी अन्…; एकनाथ शिंदेंचं बंड पुत्रप्रेमातून असण्यामागील कारणं

पाहा व्हिडीओ –

राज ठाकरेंना मागील काही काळापासून हीप बोनचा त्रास होता. पुण्यातील एका सभेतून त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शनिवारी राज ठाकरे आपल्या घरी परतले आहेत. राज ठाकरेंनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. “आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थिरतरित्या पार पडली! काही वेळापूर्वीच रुग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम असो!” असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde speaks to raj thackeray enquires about his health scsg
First published on: 27-06-2022 at 08:14 IST