...म्हणून मी त्या शेतकऱ्याच्या खरेदीखतावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली - एकनाथ शिंदे | Eknath Shinde tell incident of Farmer in Buldhana signing paper for Samruddhi Mahamarg | Loksatta

…म्हणून मी त्या शेतकऱ्याच्या खरेदीखतावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाचं काम सुरू असताना बुलडाण्यात घडलेला एक किस्सा सांगितला.

…म्हणून मी त्या शेतकऱ्याच्या खरेदीखतावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली – एकनाथ शिंदे
तसेच ठाकरे गटाला फक्त आरोप करत राजकारण करायचं आहे. एक आरोप केला होता त्यात तोंडघशी पडले. कोर्टाने त्यांना जागा दाखवली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाचं काम सुरू असताना बुलडाण्यात घडलेला एक किस्सा सांगितला. “आधीच्याच प्रकल्पांचे पैसे मिळालेले नाहीत अशी तक्रार करत शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध केला होता,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. तसेच शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मी स्वतः मंत्री म्हणून शेतकऱ्याच्या खरेदीखतावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली, असंही नमूद केलं. ते शनिवारी (१० डिसेंबर) एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होते.

“समृद्धी महामार्ग होणारच नाही असं अनेकांचं म्हणणं होतं”

एकनाथ शिंदे म्हणाले, “एमएसआरडीसी खात्याची जबाबदारी आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मला मोठी जबाबदारी देणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर समृद्धी महामार्गाची जबाबदारी माझ्यावर आली. यासाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या लवकर मिळाल्या. याला काही लोकांचा विरोध होता. हा रस्ता होणारच नाही, असे अनेकांचे म्हणणे होते. जमीन अधिग्रहणदेखील आव्हानात्मक होतं. यावेळी नागरिकांनी विरोध केला.”

“लोकांनी आधीच्याच प्रकल्पाचे पैसे मिळाले नाहीत अशी तक्रार केली”

“बुलढाण्यात लोकांनी आम्हाला आधीच्याच प्रकल्पाचे पैसे मिळाले नाहीत, अशी तक्रार केली. मी त्यांना पूर्वीचे प्रकल्प आणि हे प्रकल्प यात मला जायचं नाही सांगितलं. तसेच या प्रकल्पाचे पैसे आरटीजीएसने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असं सांगितलं. मात्र, शेतकऱ्यांना विश्वास नव्हता. त्यांनी तुम्ही पैसे जमा होतील अशी खात्री कशावरून देऊ शकता असं विचारलं. त्यानंतर मी त्या शेतकऱ्याच्या खरेदीखतावर मंत्री म्हणून मी स्वाक्षरी केली,” अशी आठवण एकनाथ शिंदेंनी सांगितली.

हेही वाचा : VIDEO: संजय राऊतांवर हल्ला करण्याची धमकी, शिंदे गटाचे आमदार म्हणाले, “त्या खेकड्याला…”

“चार तासात शेतकऱ्याच्या खात्यावर जमिनीचे पैसे जमा झाले”

“मी सही करतो आणि त्यानंतर चार तासात तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. पैसे आले की मला फोन करा, असं त्यांना सांगितलं. त्यांना विश्वासच नव्हता. आम्ही तेथून निघालो आणि पोहचल्यावर शेतकऱ्याचा फोन आला की पैसे जमा झाले,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 12:27 IST
Next Story
“हेलिकॉप्टर १० फुटांपर्यंत खाली-वर जात होतं, अन् मी…”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला थरारक अनुभव