मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशापयशाचा आढावा घेण्यासाठी तसेच मंत्री आणि आमदारांच्या कामगिरीचे मुल्यमापन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलाविली आहे. या बैठकीत १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका जिंकण्याबाबतही आखणी करण्यात येणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. निवडून आलेल्या मुंबईतील सर्व नगरसेवकांना तीन दिवस पंचतारांकित हाॅटेलात ठेवण्यात आले आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचे ३९९ नगरसेवक निवडून आले आहेत. यात मुंबईत २९, ठाणे ७५, कल्याण डोंबिवली ५४, नवी मुंबईत ४२, उल्हासनगर ३६, नाशिक २६, जळगाव २२ जागा, कोल्हापूर १५, छत्रपती संभाजी नगर १३, जालना १२ नगरसेवक निवडून आले. मुंबईत पक्षाला मिळालेल्या माफक यशाने तसेच अन्य महापालिकांमध्ये मोठा फटका बसल्याने शिवसेनेच्या गोठात अस्वस्थता पसरली आहे. ठाण्यात शिवसेनेने दणदणीत विजय मिळविला असला तरी मुंबईत पक्षाला मोठा फटका बसला आहे. पक्षाने निश्चित विजय मिळेल अशा गृहित धरलेल्या १२-१५ जागांवर अनपेक्षितपणे पराभव पत्करावा लागला.

त्यातही मुंबईत पक्ष वाढविण्याची ज्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, अशा नेत्यांनाच आपल्या नातेवाईकांना निवडूण आणता आलेले नाही. त्यामुळे मुंबईतील शिवसेनेच्या कामगिरीवर शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. अशाचप्रकारे मिरा- भाईंदर, लातूर, परभणी सारख्या महापालिकांमध्ये पक्षाची उडालेली दाणादाण शिंदे यांच्या जिव्हारी लागली असून या निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी अपेक्षित कामगिरी केली नसल्याचे पक्षात बोलले जात आहे. या पार्श्वभूमिवर शिंदे यांनी उद्या मुंबईतील आपल्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीस मंत्री, आमदार, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आदी सर्वांना बोलाविण्यात आले आहे. बैठकीत शिंदे महापालिका निवडणुकीतील मंत्री, आमदारांच्या कामगिरीची झाडाझडती घेणार आहेत. त्याप्रमाणे बैठकीत १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाची निवडणूक रणनितीही ठरविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेतील मंत्री आणि आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांच्यावर जिल्हा परिषदेची जबाबदारी कशाप्रकारे सोपविण्यात येणार याचाही निर्णय बैठकीत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन

मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या २९ नगरसेवकांचे मार्गदर्शन शिबीर शिवसेनेने आयोजित केले आहे. या शिबीरात शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नगरसेवकांना मुंबई महापालिकेच्या कामाची पद्धत, विकास आराखडा, वचननाम्याची पूर्तता करणे आणि पुढीच पाच वर्षांचा आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने मार्गदर्शन करणार असल्याची माहिती युवा सरचिटणीस व नगरसेवक अमेय घोले यांनी दिली.

हॉटेल ताज लॅंड्स एंड येथे शिवसेनेच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांचे तीन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. जनतेचा शिवसेनेवरील विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आजपासून कामाला लागायचे, असे आदेश शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आज पक्षाचे सर्व नगरसेवक शिबीरासाठी उपस्थित राहिले आहेत, असे घोले यांनी सांगितले.