मुंबई: शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर भाषण, पत्रकार परिषदांद्वारे सातत्याने बोचरी टीका करणारे शिवसेना शिंदे पक्षाचे मुख्य नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शक्यतो स्वपक्षातील नेते, मंत्री, पदाधिकारी यांना दुखावत नसल्याचे चित्र गेली चार वर्षे दिसून आले मात्र मंगळवारी मंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी चार मंत्र्यांना खडे बोल सुनावण्यास मागेपुढे न पाहिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. दीड वर्षाचा कार्य अहवाल द्या, नाहीतर खूर्ची खाली करा असा संदेश त्यांनी या बैठकीत दिल्याचे समजते.

शिंदे यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्वपक्षाच्या मंत्र्यांची एक बैठक घेतली. यावेळी नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी काही मंत्र्यांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या कामाचे केवळ निमित्त होते.शिंदे यांना काही मंत्र्यांना स्पष्ट शब्दात संदेश द्यायचा होता. ठाणे येथील सिव्हिल रुग्णालय अद्यावत करण्याचे हजारो कोटीचे काम देण्यात आले आहे.

शिंदेंच्या ठाण्यातील या कामात एका मंत्र्याने ‘माझे काय’ असा तगादा कंत्राटदाराजवळ लावल्याने शिंदे यांनी त्या मंत्र्याला नाव न घेता तंबी दिली. विर्दभातील एक मंत्री स्वपक्षा पेक्षा मित्रपक्षाला जास्त मदत करीत असल्याची नाराजी शिंदे यांनी बोलून दाखवली. शांत स्वभागाचे शिंदे आक्रमक झाल्याचे पाहून शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत अस्वस्थता पसरली आहे. प्रत्येक विषयावर माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया देणाऱ्या एका अति उत्साही मंत्र्यावरही शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

सरकारची अधिकृत भूमिका आणि पक्षाची भूमिका लक्षात न घेता वारंवार वैयक्तिक भूमिका मांडल्याने संभ्रम निर्माण होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. अनावश्यक वक्तव्यांमुळे सरकारची कोंडी होऊ शकते, त्यामुळे मंत्र्यांनी संयमाने आणि समन्वयाने माध्यमांशी संवाद साधावा, अशा सूचना त्यांनी दिल्याचे समजते. बैठकीत मंत्र्यांना मागील दीड वर्षातील कामांचा आढावा सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यांत प्रत्येक खात्याच्या कामगिरीचा सविस्तर अहवाल देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कामात दिरंगाई, समन्वयाचा अभाव आणि जनतेत चुकीचा संदेश, स्वपक्षातील आमदार, खासदारांकडे होत असलेले दुर्लक्ष बाबत शिंदे यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.