मुंबई : प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ च्या जागतिक प्रभावाचे भारतातही याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे हवामानाशी संबंधित अनेक नवे विक्रम नोंदवले जात आहेत. प्रशांत महासागरातून सध्या मोठ्या प्रमाणावर उष्णता बाहेर फेकली जात आहे. दरम्यान, नुकताच मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान ३.८ अंशांनी वाढले होते. जे आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या ‘एल निनो’ स्थितीहून सर्वाधिक आहे. दरम्यान, युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या ‘क्लायमेट इम्पॅक्ट लॅब’ने विकसित केलेल्या ‘एल निनो हीट मॉर्टेलिटी ट्रॅकर’ नुसार वाढत्या उष्णतेमुळे भारतात मार्च २०२७ पर्यंत ५५ हजार नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान बदलाचे परिणाम आता दैनंदिन जीवनात जाणवू लागले आहेत. ‘एल निनो’ मुळे यंदा भारतासह महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, डिसेंबरपर्यंत ‘एल निनो ची तीव्रता आणखीन वाढेल, असा अंदाज जभरातील हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीपासून या स्थितीची
तीव्रता पाहता काही तज्ज्ञ या स्थितीचा उल्लेख ‘सुपर अल निनो’ असा करत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या ‘क्लायमेट इम्पॅक्ट लॅब’ने विकसित केलेल्या ‘एल निनो हीट मॉर्टेलिटी ट्रॅकर’ नुसार वाढत्या उष्णतेमुळे जगभरात पुढील ६ महिन्यात ३ लाख ७३ हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू होण्याचा अंदाज असून याचा सर्वाधिक फटका ‘ग्लोबल साउथ’ मधील देशांना बसण्याची शक्यता आहे. तसेच नायजेरिया ५६ हजार तर त्या खालोखाल भारतात ५५ हजार मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१९५० नंतरची सर्वात तीव्र स्थिती १९५० नंतरची सर्वात तीव्र ‘एल निनो’ स्थितीयावर्षी प्रशांत महासागरात निर्माण झालेली ‘एल निनो’ स्थिती ही १९५० नंतरची सर्वात तीव्र स्थिती असून त्यामुळे तापमानाचे नवे विक्रम नोंदले जाऊ शकतात तसेच भविष्यात त्याची तीव्रता अधिक वाढू शकते, असा इशारा याआधीच जागतिक हवामान संघटनेकडून देण्यात आला आहे.
– ‘एल निनो’ ही स्थिती साधारणपणे प्रशांत महासागरात दर दोन किंवा सात वर्षांनी निर्माण होते. याचा प्रभाव साधारणपणे ९ ते १२ महिने टिकून राहण्याची शक्यता असते.
– या स्थितीमुळे जगातील काही भागात सरासरीहून अधिक पाऊस नोंदला जाऊन पूरपरिस्थिती निर्माण होते तर काही भागात तीव्र दुष्काळामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ‘एल निनो’ चा प्रभाव २०२७ च्या सुरुवातीपर्यंत कायम राहील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान संघटनेने वर्तवला आहे.
