मुंबई : यंदाच्या मान्सून हंगामावर प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ या स्थितीचा प्रभाव राहील, अशा शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून यामुळे देशात सरासरी पावसाच्या ९२ टक्केच पाऊस होईल असाही अंदाज व्यक्त केला आहे. ‘एल निनो’ स्थितीचा प्रभाव जानेवारी २०२७ पर्यत राहू शकतो अशी माहिती विविध हवामान संस्थांनी दिली आहे. असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी नुकतेच पत्रकार परिषेदेत सांगितले.
भारतात यंदा हवामान बदलाचे परिणाम अनेक भागातील नागरिकांना सहज करावे लागत आहेत. कुठे उष्णेतची लाटेसदृश स्थिती नोंदली जात आहे. यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे अंदाज व्यक्त केले जात असून त्याचा परिणाम शेतीवरही होण्याची शक्यता असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दीर्घकालीन ‘एल निनो’ स्थितीमुळे खरीप आणि रब्बी हंगामात पावसाचे प्रमाण कमी असेल असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. तसेच २०२७ या वर्षात जागतिक तापमानात वाढ होऊ शकते, अशीही शक्यता हवामान अभ्यास्कांकडून व्यक्त केली जात आहे.
‘एल निनो’ ची सध्याची स्थिती काय ?
हवामानाच्या या स्थितीचा प्रभाव दीर्घकाळ राहतो, साधारणपणे एप्रिलनंतर ‘एल निनो’ स्थिती निर्माण होऊन ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या आसपास या स्थितीची तीव्रता अधिक असते. यामुळे अनेकदा ही स्थिती जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत राहण्याची शक्यता असते. सध्या प्रशांत महासागरात ‘एल निनो’ तटस्थ (न्यूट्रल) स्थितीत असून महासागरचे तापमान वाढत असल्याने तो हळूहळू ‘एल निनो’ कडे वळत आहे. अभ्यासकांच्या मते, सध्या ‘एल निनो’ स्थिती प्रशांत महासागरात आधीच्या काही घटनांच्या तुलनेत अधिक वेगाने विकसित होत असून यंदा ‘एल निनो’ ची अधिक तीव्र स्थिती म्हणजे ‘सुपर एल निनो’ विकसित होईल, अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हिंदी महासागरातील स्थितीचा प्रभाव काय ?
पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल किंवा सकारात्मक हिंदी महासागर डायपोलला कधीकधी ‘भारतीय निनोही’ म्हटले जाते. सकारात्मक आयओडीच्या दरम्यान मान्सूनमधील पावसावर सकारात्मक तर नकारात्मक आयओडीच्या दरम्यान मान्सूनमधील पावसावर प्रतिकूल परिणाम होतो. प्रशांत महासागरता ”एल निनो” सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर सध्या हिंदी महासागरात आयओडी तटस्थ स्थितीत आहे. हवामान अहवालांच्या अंदाजानुसार, नैऋत्य मान्सून हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात सकारात्मक आयओडी स्थिती विकसित होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
