लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: गेले अनेक दिवस आजारी असलेल्या ६८ वर्षीय वृद्ध महिलेने घरात स्वतःला जाळून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी मुलुंड परिसरात घडली. याबाबत मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
आनंदी मुगदल असे मृत महिलेचे नाव असून त्या पतीसह मुलुंडच्या एलबीएस मार्ग परिसरात राहत होत्या. शुक्रवारी दुपारी त्यांचे पती काही कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी १२ च्या सुमारास अचानक त्यांच्या घरातून धूर येवू लागला. ही बाब इमारतीमधील रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ याबाबत अग्निशमन दल आणि मुलुंड पोलीसांना माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ आग विझवली.
आणखी वाचा-महानगरपालिकेच्या मलनिःसारण प्रयोगशाळेला एनएबीएलकडून मानांकन
या दुर्घटनेत आनंदी गंभीर भाजल्या होत्या. त्यांना तत्काळ मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. प्राथमिक तपासात महिलेने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.