राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ‘खरी शिवसेना कोणती’ यावरुन वाद सुरु असून, ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाला मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. पक्षचिन्हावरुन सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने असतानाच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – गोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा

अंधेरी (पूर्व) येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी निधन झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर कऱण्यात आली आहे. त्यानुसार, २ नोव्हेंबरला मतदान आणि ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारांना १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत आहे.

चिन्हाचं काय?

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला खरी ‘शिवसेना कोण’ याबाबत निर्णय घेण्यास सांगितलं आहे. शिंदे गटाचा ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा असल्याने निवडणुकीच्या आधी याबाबत निकाल येणार का हे पहावं लागणार आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवणुकीत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने असल्यास ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

उमेदवार कोण?

अंधेरी (पूर्व) च्या विधानसभा जागेवर एकनाथ शिंदे गट दावा करण्याच्या तयारीत असून भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर शिंदे गट दावा करीत आहे.

शिवसेना-भाजप युती २०१९ मध्ये असताना ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्याने भाजपाचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. लटके यांनी त्यांचा १६९६५ मतांनी पराभव केला, तरी ४५८०८ मते मिळवून ते दुसऱ्या स्थानी होते. लटके यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चांगली मैत्री होती. त्यामुळे शिवसेनेची ही जागा शिंदे गटाला मिळायला हवी, असे काही नेत्यांना वाटत आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक लढवू नये, असाही एक मतप्रवाह शिंदे गटामध्ये आहे. मात्र भाजपाने काही काळापासून ही जागा लढविण्याची तयारी सुरू केली असून मुरजी पटेल यांनी कामही सुरू केलं आहे.