Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली. यानुसार २ जूनला विधान परिषद निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. ९ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. तसेच या १० जागांसाठी २० जूनला मतदान होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुभाष देसाई, प्रविण दरेकर, रामराजे निंबाळकर, सदाभाऊ खोत अशा दिग्गज नेत्यांची विधान परिषदेतील दर्म संपत आहे. त्याच जागांवर निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या १० जागांपैकी ५ जागा भाजपाच्या आहेत. मात्र, सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाला ४ जागा निवडून आणता येतील असं दिसतंय.

याशिवाय शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी २ जागा आणि काँग्रेसची १ जागा निवडून येऊ शकतात. काँग्रेसला आणखी एका जागेसाठी म्हणजेच १० व्या जागेसाठी अधिक मतांची गरज आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चांगलीच टक्कर होईल.

विधान परिषद निवडणूक कार्यक्रम कसा असेल?

नोटिफिकेशन – २ जून २०२२
उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस – ९ जून २०२२
अर्जांची छाननी – १० जून २०२२
अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – १३ जून २०२२
मतदानाचा दिवस – २० जून २०२२
मतदानाची वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ४
मतमोजणीचा दिवस – २० जून २०२२ (सायंकाळी ५ वाजता)

विधान परिषदेच्या कोणत्या १० नेत्यांच्या जागा रिक्त?

१. सुभाष देसाई (शिवसेना)
२. प्रविण दरेकर (भाजपा)
३. रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी)
४. सदाभाऊ खोत (भाजपा)
५. दिवाकर रावते (शिवसेना)
६. प्रसाद लाड (भाजपा)
७. सुजीतसिंह ठाकूर (भाजपा)
८. संजय दौंड (राष्ट्रवादी)
९. विनायक मेटे (भाजपा)
१०. रामनिवास सिंह (भाजपा, निधन झाल्याने जागा रिक्त)

विधान परिषदेच्या या १० जागा ७ जुलै रोजी रिक्त होत आहे. त्या जागांसाठीच २० जूनला मतदान होणार आहे.

विधान परिषदेवर निवडून जाण्याचं गणित काय?

विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला एकूण २७ आमदारांच्या मतांची आवश्यकता असते. भाजपाकडे मित्रपक्षांसह मिळून एकूण ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. या संख्याबळानुसार भाजपाच्या ४ जागा अगदी सहज निवडून येतील. राष्ट्रवादीकडे ५४ आमदार, शिवसेनेकडे ५६ आमदार आणि काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत. या संख्याबळानुसार विधान परिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार निवडून येतील. काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल, तर दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसला भाजपाशी लढत द्यावी लागेल.

हेही वाचा : विश्लेषण : राष्ट्रपतीपद निवडणुकीत मतांचे मूल्य कसे ठरते?

दरम्यान, या संख्याबळानुसार प्रत्येक पक्षातील नेत्यांकडून विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. भाजपाच्या तर ५ जागा रिक्त होत असून ४ जागाच निवडून येत असल्याने भाजपाकडून कोणाला संधी मिळते आणि कोणाचा पत्ता कट होतो यावर चर्चा रंगू लागली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission announce vidhan parishad election for 10 seats pbs
First published on: 25-05-2022 at 21:46 IST