मुंबई : तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या किंवा त्याच शहरातील मूळ रहिवासी असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. याचा फटका मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी. वेलारासू या अधिकाऱ्यांना बसणार आहे.

हेही वाचा >>> खासदार अनिल देसाई यांच्या निकटवर्तीया विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुका मुक्त आणि मोकळ्या तसेच पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणुक प्रक्रियेशी सबंधित महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार एकाच पदावर तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या किंवा गृह जिल्हा असलेल्या पोलीस दलातील आयुक्त, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपायुक्त आदी तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार अशा महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून केल्या आहेत. हा नियम आतापर्यंत महापालिका आयुक्तांना लागू होत नव्हता. त्यानुसार महापालिका आयुक्तांना सरकारने अभय दिले होते.

अनेक आयुक्तांच्या बदल्या

निवडणूक आयोगाने मात्र यंदा महापालिका आयुक्तांनाही हा बदल्यांचा नियम लागू केला असून या नियमांत बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील आदेश निवडणूक आयोगाने आजच राज्य शासनास दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या आदेशाचा फटका मुंबई, पुणे आणि अकोला महापालिकांना बसणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भ़िडे व. पी. वेलारासू, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अकोला व अन्य काही महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना बसणार आहे.