मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक तास ताटकळत ठेवल्यानंतर भेट दिली. आम्ही अनेक तक्रारी केल्या, आरोप केले. त्या बाबचे पुरावे आयोगाला दिले. पण, आयोगाने एक शब्दही उच्चारला नाही. आमच्या प्रश्नांवर आयोगाने मौन व्रत घेतले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

महाविकास आघाडीसह, मनसे आणि काही मित्र पक्षांचे प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाची वेळ घेऊन भेटण्यासाठी गेले होते. पण, अनेक तास ताटकळत ठेवल्यानंतर भेट झाली. आम्ही अनेक आरोप केले, तक्रारी केल्या. त्या बाबतचे सर्व पुरावे आम्ही आयोगाला दिले. पण, आयोगाने एक शब्दही उच्चारला नाही. आमचे आरोप खरे आहेत असेही म्हटले नाही किंवा खोटे आहेत, असेही आयोगाने म्हटले नाही. आमच्या शिष्टमंडळाच्या पदरात काहीच पडले नाही. हा प्रकार आमच्यासाठी खूप निराशाजनक होते, असे सुळे म्हणाल्या.

राज्यातील दुबार मतदान रोखणार कसे, हा आमचा प्रश्न आहे. मतदार याद्यांमधील दुबार मतदारांना रद्द करण्याची गरज आहे. सरकारकडे कृत्रिम बुद्धिमत्तेसह अनेक पर्याय आहेत, ज्याद्वारे एक – दोन महिन्यांत दुबार मतदारांना मतदार यादीतून बाजूला काढणे सहज शक्य आहे. अशा सदोष मतदार याद्यांवर निवडणुका घेण्यात काहीच अर्थ नाही. हे एका सशक्त लोकशाहीला शोभणारे नाही. मतदार याद्यांमधील दोष दूर करूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात. गेल्या सात वर्षांपासून निवडणुका रखडल्या असताना, आताच घाई का केली जाते, असा सवालही सुळे यांनी केला.

महाविकास आघाडी म्हणून लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शक्य तिथे महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरला, तर त्या ठिकाणाबाबत निर्णय घेतला जाईल. सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन आठ दिवसांत निर्णय जाहीर करू, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.