मुंबई : ‘मोगॅम्बो’च्या कितीही पिढय़ा उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही. शिवसेना हा विचार आहे, तो कुणालाही चोरता येणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केले. केंद्रीय निवडणूक आयोग हा निव्वळ चुना लावणारा असून आयोगावरचा विश्वासच उडाला असल्याची टीका ठाकरे यांनी केली.
मराठी भाषा दिनानिमित्त स्थानीय लोकाधिकार समितीने आयोजित कार्यक्रमात ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नामोल्लेख न करता ‘मोगॅम्बो’ असा करून त्यांच्यावर, भाजप, शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने चोमडेपणा केला आणि गद्दारांना धनुष्यबाण चिन्ह व पक्षाचे शिवसेना हे नाव दिले.