मुंबई: ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज, रविवारी पार पडणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी आमदार विद्या चव्हाण इत्यादी दिग्गज मंडळी उमेदवारीच्या रिंगणात उतरली आहेत. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत धर्मादाय आयुक्तांनी या निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिला होता.

‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या विविध शाखांमध्ये पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबरला लागला. यातून ३४ जण सर्वसाधारण सभेवर निवडून आले. यातील १५ जणांच्या कार्यकारिणीची निवड रविवारी होणार होती; मात्र त्यापूर्वीच १५ जणांची बिनविरोध निवड झाल्याने रविवारी केवळ निवडीचीऔपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. गेली ४० वर्षे शरद पवार हे ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी आहेत. या वेळी त्यांनी पुन्हा अध्यक्ष पदासाठी अर्ज सादर के ला असून ‘आप’चे धनंजय शिंदे त्यांच्या विरोधात उभे आहेत.

अध्यक्षांबरोबरच ७ उपाध्यक्षांचीही निवड केली जाते. यासाठी सध्याचे उपाध्यक्ष भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार विद्या चव्हाण, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत असे एकू ण १४ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही पदांसाठी सर्वसाधारण सभेतील ३४ जण मतदान करणार आहेत. इतर सभासदांना तसेच प्रत्यक्ष उमेदवारांनाही मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे संस्थेचे आजीव सभासद अनिल गलगली यांनी या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे.  सर्वसाधारण सभेची निवडणूक घटनाबाह्य असल्याचा आरोप करत गलगली आणि अन्य काही सभासदांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना याबाबत सुनावणीचे आदेश दिले. शुक्रवारी धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी घेत निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे रविवारी ही निवडणूक घेतली जात आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत सर्वसाधारण सभेतील सदस्य मतदान करतात. निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार हे सर्वसाधारण सभेचा भाग नसल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नाही, असे निवडणूक अधिकारी किरण सोनावणे यांनी स्पष्ट के ले.