scorecardresearch

विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी चुरस; २० जूनला निवडणूक

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जूनला निवडणूक होत असून, राज्यसभेच्या सहाव्या जागेप्रमाणेच विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चुरस होणार आहे.

vidhansabha
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जूनला निवडणूक होत असून, राज्यसभेच्या सहाव्या जागेप्रमाणेच विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चुरस होणार आहे. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, २ ते ९ जून या काळात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. १३ तारखेपर्यंत माघार घेता येईल. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जशी चुरस आहे तशीच चुरस विधान परिषदेच्या दहाव्या जागेकरिता असेल. विधान परिषदेतील भाजपचे सहा  तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन जण निवृत्त होत आहेत. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये सभापती रामराजे नाईक- िनबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा समावेश असून, या तिघांना त्यांचा पक्ष पुन्हा संधी देणार का, याची उत्सुकता असेल.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे सहा जण असले तरी विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. दहाव्या जागेसाठीच चुरस असेल. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीने जोर लावला तसाच जोर विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी लावला जाऊ शकतो. राज्यसभेत खुल्या पद्धतीने मतदान असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता कमी असते. याउलट विधान परिषदेकरिता गुप्त मतदान असल्याने मतांची फाटाफूट होण्याचा धोका अधिक असतो.

विधान परिषदेसाठी विजयाकरिता आवश्यक मतांचा कोटा –  २६.१०

निवृत्त होणारे सदस्य

  • सभापती रामराजे नाईक – निंबाळकर (राष्ट्रवादी)
  • उद्योगमंत्री सुभाष देसाई (शिवसेना)
  • विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (भाजप)
  • दिवाकर रावते (शिवसेना)
  • सुजितसिंह ठाकूर (भाजप)
  • विनायक मेटे (भाजप)
  • प्रसाद लाड (भाजप)
  • सदाभाऊ खोत (भाजप)
  • संजय दौंड (राष्ट्रवादी)
  • आर. एस. सिंग (भाजप) निधनामुळे जागा रिक्त

काँग्रेससाठी दुसऱ्या जागेचे आव्हान

राज्यसभेकरिता दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या वाटय़ाला एक अतिरिक्त जागा आली होती. या वेळी राज्यसभेची अतिरिक्त जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला देण्यात आली. विधान परिषदेची अतिरिक्त जागा मिळावी म्हणून काँग्रेस आग्रह धरणार आहे. काँग्रेसकडे १६ मते अतिरिक्त ठरतात. अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या मदतीने ११ मते काँग्रेसला मिळवावी लागतील. यासाठी अपक्ष व छोटय़ा पक्षांचा पाठिंबा मिळेल याची काँग्रेसला खबरदारी घ्यावी लागेल. भाजपने एखादा आर्थिकदृष्टय़ा तगडा उमेदवार रिंगणात उतरविला आणि त्याने अपक्षांना गळाला लावल्यास दहाव्या जागेसाठी चुरशीची लढत होईल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election politics tenth seat legislative council election june 20 ysh