scorecardresearch

महापालिका, जिल्हा परिषदांमधील निवडणूक प्रक्रिया स्थगित

आधीच्या महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिका व जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमधील प्रभाग रचना तसेच सदस्य संख्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता.

election-2
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबईसह सर्व महानरपालिका आणि जिल्हा परिषदांमधीस सदस्यंख्या कमी करण्याबाबतचा अध्यादेश जारी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह २३ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, तसेच २८४ पंचायत समित्यांमध्ये वेगवेगळय़ा स्तरावर सुरु असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे.

 आधीच्या महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिका व जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमधील प्रभाग रचना तसेच सदस्य संख्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबई महापालिका व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनयमांमध्ये सुधारणा करण्यात आली होती. शिंदे-फडणवीस सरकारने आघाडी सरकारचे ने निर्णय रद्द करण्यासाठी पुन्हा या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन स्वतंत्र अध्यादेश जारी केले आहेत. निवडणूक आयोगाने त्यावर लगेचच निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले.

जिल्हा परिषद, पंचायत समित्या : सध्या २५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्याचबरोबर १३ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी ८ ऑगस्ट रोजी, तर १२ जिल्हा परिषदा व त्यांच्यातर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी १० ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली असून, यथावकाश पुढील आदेश देण्यात येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election process municipal corporation zilla parishad suspended membership councils election ysh

ताज्या बातम्या