मुंबई : कुर्ला येथील खासगी शाळेतील शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीत, मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी निवडणूक कामे लावण्यात आली आहेत, असे निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केले. त्यानंतर, परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे लावण्याविरोधात पालकांनी केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली.

परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे लावणे हे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असा दावा करून शिक्षकांना आगामी विधानसभा निवडणुकीची कामे लावणाऱ्या परिपत्रकाला कुर्ला येथील ग्रीन मुंबई प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आव्हान दिले होते. न्यायालयानेही या याचिकेची दखल घेऊन निवडणूक आयोगाला सोमवारपर्यंत या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा >>>‘विंगेतील गलबल्या’मुळे कलाकारांची राजकीय रंगमंचाकडे पाठ

त्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी, शिक्षकांना निवडणूक कामे लावण्याबाबतच्या आधीच्या परिपत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित परिपत्रकानुसार, याचिकाकर्त्यांची मुले शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकांना केवळ दिवाळीच्या सुट्टीत म्हणजेच २० ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या काळात आणि मतदानाच्या दिवशी, मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक कामे लावण्यात आल्याचे आयोगाच्या वतीने वकील अक्षय शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले. परंतु, दिवाळीच्या सुट्टीत शिक्षक उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामात व्यग्र असल्याचे सांगून याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील गायत्री सिंह यांनी आयोगाच्या सुधारित परिपत्रकालाही आक्षेप घेतला. न्यायालयाने मात्र आयोगाचे सुधारित परिपत्रक योग्य असल्याचे आणि पालिकांच्या भीतीचे निराकरण करणारे असल्याचे नमूद केले. त्याचप्रमाणे, शिक्षकांनी त्याचे पालन करावे, असे स्पष्ट करून याचिका निकाली काढली.

Story img Loader