मुंबई : राज्यात २०१४-१५ ते २०२३-२४ या दहा वर्षांच्या कालावधीत वीजवापरात ४३.६ टक्के वाढ झाली असून वीजनिर्मितीत ३८.५ टक्के वाढ झाली आहे, तर अपारंपरिक वीजनिर्मितीत ८३.९ टक्के वाढ झाली आहे.

वीजहानीत वाढ

राज्यात २०२३-२४ मध्ये महापारेषणची वीजहानी ३.२७ टक्के होती, तर २०२४-२५ मध्ये त्यात किंचित वाढ होऊन ती ३.३७ टक्के झाली. मात्र याच कालावधीत महावितरणच्या तांत्रिक व व्यावसायिक वीजहानीत १५.८ टक्क्यांवरून १९.३ टक्के अशी साडेतीन टक्क्यांची वाढ झाली.

● राज्यातील वीजवापर (२०१४-१५ मध्ये) : १,१२,८५५ दशलक्ष युनिट

● सध्याचा वीजवापर : १,६२,०५४ दशलक्ष युनिट

● वीजनिर्मिती : (२०१४-१५ मध्ये) : १,०३,७७९ दशलक्ष युनिट

● सध्याची वीजनिर्मिती : १,४३,७४६ दशलक्ष युनिट

● अपारंपरिक विजेची स्थापित क्षमता : (२०१४-१५ मध्ये) : ६,७१७ मेगावॉट

● सध्याची क्षमता : १२,३५५ मेगावॉट

● सौरऊर्जेचा वाटा : ४.९ टक्क्यांवरून ३१.७ टक्के वाढ.

राज्यात ७० लाख बेरोजगार

मुंबई : राज्यात उद्याोगधंदे व रोजगारांच्या संख्येत वाढ झाली असली तरी बेरोजगारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्यात देशी व परदेशी गुंतवणूक वाढत असून गेल्या काही वर्षांत मोठी आर्थिक गुंतवणूक राज्यात झाली आहे. मात्र त्या तुलनेत रोजगारांमध्ये वाढ झाल्याचे आढळून येत नसून बेरोजगारांचा आकडा मात्र फुगत आहे. राज्यात २०२२ मध्ये बेरोजगारांची संख्या ५८ लाख ७८ हजार होती, ती २०२३ मध्ये ६२ लाख ७८ हजार झाली आणि ती २०२४ मध्ये ७० लाख ६३ हजारपर्यंत वाढली आहे.

रोजगारातही वाढ

राज्यात खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील रोजगारात काही प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात २०२२ मध्ये या दोन्ही क्षेत्रांत एकूण ८२ लाख २४ हजार इतक्या लोकांना रोजगार मिळाला, तर २३ मध्ये त्यात वाढ होऊन ८४ लाख ७१ हजार लोकांना रोजगार मिळाला. रोजगारात सातत्याने वाढ होतच असून २०२४ मध्ये जूनपर्यंतच्या पहिल्या तिमाहीत ३४ लाख १२ हजार कामगार-कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला.