scorecardresearch

मुंबईकरांना एप्रिलमध्ये वीज दरवाढीचा झटका?

अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर कंपनीकडून दरवाढीसाठी MERCकडे प्रस्ताव

मुंबईकरांना एप्रिलमध्ये वीज दरवाढीचा झटका?
(फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

मुंबईकरांना भर उन्हाळ्यात वीज दरवाढीचा झटकाही सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे. कारण, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड आणि टाटा पॉवर कंपनी या दोन प्रमुख वीज पुरवठादारांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे(MERC) एप्रिल महिन्यापासून दरवाढ प्रस्तावित केली आहे.

या दोन्ही कंपन्यांनी २०२३ ते २०२५ या दोन वर्षांसाठी वीज वाढीची याचिका दाखल केली आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांच्या वीज टक्का वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे मुंबईकरांच्या वीज बिलात जवळपास ५० रुपयांची वाढ होणार आहे. या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. यानंतर मार्च महिन्यात दरवाढ लागू होऊन एप्रिल महिन्यापासून ग्राहकांना नव्या दरानुसार वीजबिल मिळू शकते.

अदानी इलेक्ट्रिसिटीने निवासी ग्राहकांसाठी एप्रिलपासून वीज दरात २-७ टक्के आणि कमी श्रेणीच्या ग्राहकांसाठी टाटा पॉवरने १०-३० टक्के आणि उच्च श्रेणीतील ग्राहकांसाठी ६-७ टक्के दरवाढ प्रस्ताविक केली आहे. सध्याचा सरासरी वीज पुरवठ्याचा दर ७.२७ रुपये प्रति युनिट आहे. या दरात आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. कोळशाच्या वाढत्या किंमतीमुळेही वीज दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीने अनुक्रमे २४ हजार ८३२ कोटी रुपये आणि सात हजार ८१८ जादा खर्चापोटी पुढील दोन वर्षांत मिळावेत, अशी मागणी करणाऱ्या फेरआढावा याचिका राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर केल्या आहेत. ही दरवाढ मंजूर झाल्यास महानिर्मितीच्या खर्चापोटी प्रति युनिट १.०३ रुपये तर महापारेषणच्या खर्चापोटी प्रति युनिट ३२ पैसे असा एकूण प्रति युनिट १.३५ रुपये असा बोजा ग्राहकांवर पडणार आहे.

वीज नियामक आयोगाने ३० मार्च २०२० रोजी पाच वर्षांसाठी बहुवर्षीय वीज दरनिश्चिती आदेश जाहीर केला आहे. पण कायद्यातील तरतुदीनुसार तिसऱ्या वर्षी या कंपन्यांना फेरआढावा याचिका दाखल करता येते. त्यानुसार आता महानिर्मिती आणि महापारेषण या दोन कंपन्यांनी फेरआढावा याचिका दाखल केल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 14:05 IST

संबंधित बातम्या