वीजमाफियांचीही बत्ती गुल!

मुंबईतील विविध भागांत सकाळी ९ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू असतो.

फेरीवाले हटवल्याने चोरून वीज पुरवणाऱ्यांवरही वचक

मुंबईतील विविध भागांत विशेषत: रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे झाले असतानाच या फेरीवाल्यांना बिनदिक्कत चोरून वीज पुरवणाऱ्यांच्याही नाडय़ा आवळल्या गेल्या आहेत. बेकायदा कागदपत्रांच्या आधारे वीजमीटर मिळवून त्याद्वारे फेरीवाल्यांना दरमहा ५०० रुपयांच्या बोलीवर वीजपुरवठा केला जातो. मात्र, सध्या फेरीवालेच रस्त्यावर बसेनासे झाल्यामुळे या वीजमाफियांचाही धंदा बसला आहे.

मुंबईतील विविध भागांत सकाळी ९ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू असतो. मात्र, सायंकाळनंतर ग्राहकांची संख्या वाढत असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करणारे फेरीवाले भरपूर आहेत. अशा फेरीवाल्यांना बेकायदा वीजपुरवठा करणाऱ्या वीजमाफियांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. विजेच्या एका दिव्यासाठी या माफियांना फेरीवाल्यांकडून दरमहा ५०० रुपये मिळतात. तसेच पहिल्यांदा जोडणी घेणाऱ्याकडून रीतसर एक हजार रुपयेही घेतले जातात. अशाप्रकारे ९० ते ९५ टक्के फेरीवाल्यांना बेकायदा वीज पुरवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही भागांत स्थानिक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्तेच हा व्यवसाय करत असल्याचे समजते.

अनधिकृत कागदपत्रे तयार करून काही माफियांनी वीज कंपन्यांकडून विचेचे मीटर घेतले आहेत. त्यातून दीडशे ते दोनशे फेरीवाल्यांना ही वीज पुरवली जाते. तर काही ठिकाणी दुकानदारच आपल्या वीज मीटरमधून फेरीवाल्यांना वीज पुरवत असल्याचे देखील समोर आले आहे. याशिवाय काही माफिया वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून वीज बॉक्स आणि रस्त्यावरील विजेच्या खांबांतून चोरून वीज घेत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक परिसरात चार ते पाच वीज माफिया असून त्यांचा महिन्याचा नफा लाखोंच्या घरात आहे. यातून काही रक्कम वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीतील एखाद्या अधिकाऱ्याला आणि थोडा हप्ता पोलिसांना देखील दिला जात असल्याची माहिती एका माफियाने दिली आहे.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर सर्वच ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याने सध्या रेल्वे स्थानक परिसरातील सर्व रस्ते मोकळे झाले आहेत. मात्र रस्त्यांवर फेरीवालेच नसल्याने वीज माफियांचा धंदा पूर्णपणे मंदावला आहे. दीडशे मीटर पुढे काही ठिकाणी सध्या फेरीवाले बसत आहेत. मात्र पालिका आणि पोलिसांचा मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त असल्याने वीज माफियांनी सर्व वीजजोडण्या बंदच ठेवल्या आहेत. यासंदर्भात मुंबई उपनगरांत वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून येत्या आठ दिवसांत कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे मनसेचे नितीन नांदगावकर यांनी सांगितले. तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘तक्रार मिळताच अशा ठिकाणी तातडीने कारवाई करण्यात येते,’ असे म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Electricity theft issue hawkers issue