शहरातील प्रत्येक घरात किमान चार स्मार्टफोन, फ्रिज, टीव्ही, ओव्हन, वॉशिंग मशीन आणि एसी ही उत्पादने असतातच. याशिवाय यात आता लॅपटॉप आणि इतर गॅजेट्सचीही भर पडू लागली आहे. वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर या वस्तूंचा किंमतीत चार ते पाच टक्क्यांनी वाढ होणार आहे. मात्र याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर तितक्या मोठय़ा प्रमाणावर होणार नाही, असा दावा उत्पादकांनी केला आहे.

शुक्रवार मध्यरात्रीपासून लागू झालेल्या वस्तू व सेवा करामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील कराचा दर १२, १८ आणि २८ टक्के होणार आहे. मात्र देशभरात एकच कर व्यवस्था लागू होणार आहे. तसेच जकात नाकेही हटणार आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार आहे. याचा फायदा उद्योगांना नक्कीच होणार आहे. हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा उत्पादक विचार करत आहेत. यामुळे ग्राहकांना या वाढीचा फटका फारसा होणार नसल्याचे चित्र आहे. तर विक्रेत्यांनीही ग्राहकांना सवलती देऊन या उपकरणांवरील किंमती सध्या आहेत त्यापेक्षा अवघ्या एक ते दोन टक्क्यांनी वाढ होईल, अशी योजना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या करवाढीचा थेट ग्राहकांवर बोजा पडणार नाही यासाठी उत्पादक आणि विक्रेते प्रयत्नशील आहेत. जर या वस्तूंच्या किंमतीत जास्त वाढ झाली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या शहरांमध्ये सध्या वाढत असलेल्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो यामुळे हा खटाटोप असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नवीन करप्रमणालीमुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीमध्ये चार ते पाच टक्क्यांनी वाढ होणार आहे. राज्यातील कर व जकात रद्द होणार आहे. यामुळे या जकात नाक्यांवर लागणाऱ्या वेळात मोठय़ा प्रमाणावर बचत होणार आहे. यामुळे उत्पादनांची वाहतूक जलद गतीने होणार आहे. परिणामी वाहतुकीच्या खर्चात एक ते दीड टक्क्यांनी कपात होणार असल्याचे व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजचे संचालक अनिरुद्ध धूत यांनी सांगितले. ही बचत आम्ही उत्पादनांची किंमत ठरविताना विचारात घेणार आहोत. यामुळे ग्राहकांना चार ते पाच ऐवजी दोन ते तीन टक्केच दर वाढीचा भार सहन करावा लागेल, असेही धूत म्हणाले.

जीएसटी विरोध

मुंबई : देशभरात वस्तू -सेवा कराची अंमलबजावणी होण्यास काही अवधी असताना शुक्रवारी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जीएसटीविरोधात मतप्रदर्शन करीत असलेली जुनी चित्रफीत प्रसारित केली आहे. काँग्रेसने त्यांच्या ट्विटर हँडलवर ही चित्रफीत जारी केली असून मोदीजी, तुम्ही इतक्या लवकर तुमचेच शब्द कसे विसरता? देशात पायाभूत संरचना उभी केली नसताना व अन्य पूर्वतयारी केलेली नसताना तुम्ही जीएसटीची अंमलबजावणी कशी काय करता, असे काँग्रेसने म्हटले आहे. ही चित्रफीत नेमकी कोणत्या तारखेची ते समजू शकले नाही.