मुंबई : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून दोन्ही परीक्षांसाठी १० जुलैपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. नियमित नोंदणी १० ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. यंदा एलिमेंटरी परीक्षा २८ व २९ सप्टेंबर, तर इंटरमिजिएट परीक्षा ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना १० जुलै ते १० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ११ ते २१ ऑगस्टदरम्यान विलंब शुल्कासह, तर २२ ते ३० ऑगस्टदरम्यान अतिविलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जाणार आहेत. परीक्षा शुल्कही या टप्प्यानुसार आकारले जाणार आहे. यंदा एलिमेंटरी परीक्षा २८ व २९ सप्टेंबर, तर इंटरमिजिएट परीक्षा ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या पहिल्या दिवशी वस्तुचित्र आणि स्मरणचित्र, तर दुसऱ्या दिवशी संकल्पचित्र (डिझाइन) तसेच कर्तनभूमिती व अक्षरलेखन हे विषय असतील. इंटरमिजिएट परीक्षेत पहिल्या दिवशी स्थिरचित्र आणि स्मरणचित्र, तर दुसऱ्या दिवशी संकल्पचित्र (डिझाइन) तसेच भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन या विषयांची परीक्षा होईल.

केंद्रांची माहिती अद्ययावत करणे, सहभागी शाळांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी तसेच परीक्षक आणि समालोचकांची नोंदणी ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी करताना नावातील चुका टाळण्यासाठी शाळांच्या जनरल रजिस्टरमधील नावाप्रमाणेच माहिती भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थी, पालक आणि सहभागी शाळांनी नोंदणी व परीक्षा प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

असे आहे परीक्षेचे वेळापत्रक

एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा ही २८ व २९ सप्टेंबर रोजी होणार असून, २८ सप्टेंबरला सकाळी १०.३० ते दुपारी १ या कालावधीत वस्तुचित्र या विषयाची तर दुपारी २ ते ४ या कालावधीत स्मरणचित्र या विषयाची परीक्षा होणार आहे. तसेच २९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या कालावधीत संकल्पचित्र-नक्षीकाम आणि दुपारी २ ते ४ या कालावधीत कर्तनभूमिती व अक्षरलेखन या विषयाची परीक्षा होणार आहे. तसेच ३० सप्टेंबर रोजी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा स्थिरचित्र हा पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १.३० आणि स्मरणचित्र हा पेपर दुपारी २.३० ते ४.३० या कालावधीत होणार आहे. १ ऑक्टोबर रोजी संकल्पचित्र- नक्षीकाम हा पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १.३० आणि भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन हा पेपर दुपारी २.३० ते ४.३० या कालावधीत होईल.