मुंबई : घारापुरी अर्थात एलिफंटा बेटावर सुरू असलेल्या उत्खननात सुमारे १५०० वर्षांपूर्वीचा दगड-विटांनी बांधलेल्या पायऱ्यांच्या जलाशयाचा शोध उत्खनन करणाऱ्या चमूला लागला आहे. प्राचीन जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण शोध मानला जात असून ‘टी’ आकाराची ही रचना बेटावरील पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनबद्ध उपाययोजनांचे उदाहरण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे (एएसआय) बेटाच्या पूर्वेकडील मोराबंदर परिसरात सुरू असलेल्या उत्खननात ही रचना सापडली. पुरातत्त्वज्ञ अधीक्षक डॉ. अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आतापर्यंत सुमारे ५ मीटर खोलवर उत्खनन केले असून २० पायऱ्या उघडकीस आल्या आहेत. ही रचना सुमारे १४.७ मीटर लांब असून ६.७ ते १०.८ मीटर रुंद अशी आहे.
एलिफंटा बेट लेणींसाठी जगप्रसिद्ध असले तरी हा जलाशय मात्र कोरून तयार केलेला नाही तर दगड व विटांनी बांधलेला आहे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. बेटावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असली तरी खडकाळ भूभागामुळे पाणी साठून राहत नाही, ते समुद्रात वाहून जाते. त्यामुळे पावसाळ्यानंतर उद््भवणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी या खास जलाशयाची निर्मिती करण्यात आली असावी. त्याची रचना एखाद्या जलाशयाप्रमाणेच आहे, अशी माहिती डॉ. अभिजित आंबेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
तज्ज्ञांच्या मते, मंदिराशी संबंधित नसल्यामुळे या रचनेला ‘कुंड’ म्हणता येणार नाही. मात्र गुजरात आणि राजस्थानमधील अशाच प्रकारे तेथील स्थानिक भाषेत बावडींची रचना केलेली असते. त्याच धर्तीवर ही स्थानिक स्वरूपातील घारापुरी येथील रचना असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या जलव्यवस्थापन प्रणालीचा विकास इसवी सनाच्या सातव्या शतकाच्या सुमारास झाल्याचे मानले जाते.
व्यापारी जाळ्याचेही पुरावे सापडले
उत्खननात रोमन काळातील ॲम्फोरा भांड्यांचे तुकडे, मेसोपोटेमियातील ‘टॉरपीडो जार’ तसेच आयात केलेली काच व मातीची भांडी यांचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. या अवशेषांवरून एलिफंटा बेट प्राचीन आंतरराष्ट्रीय समुद्री व्यापारी जाळ्याचा भाग होते, हे स्पष्ट होते. याशिवाय ११ नाणीही सापडली आहे. त्यापैकी काही तांब्याची नाणी कलचुरी वंशातील राजा कृष्णराज यांच्या कारकिर्दीतील असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातील पुरातत्त्वज्ञ डॉ. अभिजित दांडेकर यांनी सांगितले.
