मुंबई : नुकताच घारापुरी अर्थात एलिफंटा बेटावर सुरू असलेल्या उत्खननात सुमारे १५०० वर्षांपूर्वीचा दगड-विटांनी बांधलेल्या पायऱ्यांच्या जलाशयाचा शोध उत्खनन करणाऱ्या टीमला लागला. प्राचीन जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण शोध मानला जात असून ‘टी’ आकाराची ही रचना बेटावरील पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनबद्ध उपाययोजनांचे उदाहरण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे एलिफंटा बेट पुन्हा चर्चेत आले असून मुंबईच्या अगदी जवळ असणाऱ्या या बेटाविषयी अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे.

एलिफंटा बेटाचे वैशिष्ट्य काय ?

घारापुरी अर्थात एलिफंटा बेट हे महाराष्ट्रातील शैव संप्रदायी लेण्यांचे प्रसिद्ध स्थळ आहे. या स्थळाचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत करण्यात आला आहे. या बेटावर पाच लेण्यांचा समूह असून तो घारापुरी या नावाने ओळखली जातात. घारापुरीच्या लेण्यांचा आलेख सर्वसाधारणपणे अधिक या चिन्हासारखा असून या लेण्यांची रचना येथील स्तंभ आणि शिल्पे यांची रचना वेरूळच्या दुमार लेण्यासारखी आहे. येथील शिल्पांची वैशिष्ट्य म्हणजे त्यावर असणारे भाव. यासाठी ही शिल्पअद्वितीय मानली जातात. या लेण्यांना दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात.

घारापुरी बेटावरील लेणी किती जुनी ?

काही अभ्यासकांच्या मते ही लेणी आठव्या-नवव्या शतकांत खोदलेली किंवा राष्ट्रकूट राजवटीतील असावीत. तर चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने हर्षवर्धनाच्या पराभवानंतर ही लेणी खोदली, असेही काहींचे म्हणणे आहे. तर काही अभ्यासकांच्या मता नुसार सहाव्या ते नवव्या शतकात कोकणात राज्य करणाऱ्या मौर्य-शिलाहार राजांची ‘मंगळपुरी’ नावाची राजधानी हीच घारापुरी असावी. तसेच याबाबत काही दंतकथाही प्रसिद्ध असून त्यातीलच एक म्हणजे, पांडवांनी किंवा बाणासुराने या गुहा खोदल्याची कथाही प्रसिद्ध आहे.

प्राचीन भारत आणि इराणचे व्यापारी संबंध

नुकताच या बेटावरील उत्खननात काही भांड्यांचे अवशेष सापडले असून या भांड्यांवर इराणी (पर्शियन) शैलीचा प्रभाव दिसतो असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे. यामुळे प्राचीन भारत आणि इराण यांच्यात अरबी समुद्रामार्गे होणाऱ्या व्यापारात एलिफंटा बेटाचे असणारे महत्व अधोरेखित होत आहे. यामुळे लेण्यांसाठी प्रसिद्ध असणारे हे बेट प्राचीन काळापासून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते यासाठीचा हा प्रबळ पुरावा मनाला जात आहे. यामुळे या बेटासंबंधी नव्या इतिहासावर प्रकाश टाकला जात असून अजूनही सुरु असणाऱ्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींचा उलगडा होणार आहे.