पदवी प्रवेशासाठीचे पात्रता गुण घटले; नामांकित महाविद्यालयांत

गेली दोन वर्षे नामांकित महाविद्यालयांत पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ९० ते ९५ टक्के गुण कमी पडावेत, अशी परिस्थिती होती.

student
संग्रहीत फोटो

प्रवेश सुकर

मुंबई : गेली दोन वर्षे नामांकित महाविद्यालयांत पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ९० ते ९५ टक्के गुण कमी पडावेत, अशी परिस्थिती होती. यंदा मात्र मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत या प्रवेशासाठी पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) घट झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ ते १० टक्क्यांनी पात्रता गुणांमध्ये घट झाल्याचे दिसत आहे.

मुंबई विद्यापीठाने दिलेल्या वेळापत्रकानुसार संलग्न महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवीच्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएएफ, बीएमएम आदी अनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांची पहिली प्रवेश यादी काही महाविद्यालयांनी बुधवारी जाहीर केली. यंदा राज्य मंडळाचा बारावीचा निकाल घटला त्याबरोबरच गुणही कमी झाले आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक

गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. त्याचबरोबर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह इतर मंडळांचे निकालही रखडले आहेत. त्याचा परिणाम यंदा पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशावर झाल्याचे दिसत आहे. 

तीन वर्षे मुंबईतील नामांकित महाविद्यालयांत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिल्या गुणवत्ता यादीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच स्थान मिळाले होते. मात्र, यंदा ५ ते १० टक्क्यांनी पहिल्या गुणवत्ता यादीतील पात्रता गुण घटले आहेत. अनेक महाविद्यालयांची पहिली गुणवत्ता यादी ९० टक्क्यांपेक्षा कमी गुणांवर बंद झाली आहे. विज्ञान आणि गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद असलेल्या वाणिज्य अभ्यासक्रमांचेही पात्रता गुण घटल्याचे दिसत आहे. 

झेविअर्स महाविद्यालयाची कला शाखेची प्रवेश यादी ९२ टक्क्यांवर बंद झाली. गेल्या वर्षी पहिल्या यादीतील प्रवेश पात्रता गुण ९८ टक्के होते. विज्ञान शाखेची प्रवेश यादी ८२ टक्क्यांवर बंद झाली आहे. रुईया महाविद्यालयाची कला शाखेची प्रवेश यादी ८९ टक्क्यांवर, तर विज्ञान शाखेची प्रवेश यादी साधारण ७४ टक्क्यांवर बंद झाली आहे. पोद्दार महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची यादी ९२.३३ टक्क्यांवर बंद झाली आहे. तर गेल्या वर्षी या महाविद्यालयाची प्रवेश यादी ९६.६० टक्क्यांवर बंद झाली होती. त्याशिवाय अनेक नामांकित महाविद्यालयांतील वाणिज्य शाखेची पहिली यादी ९० टक्क्यांपेक्षा कमी गुणांवर बंद झाली आहे.

अनेक संस्थांची यादीकडे पाठ..

विद्यापीठाच्या सूचनेनुसार महाविद्यालयांनी बुधवारी पहिली प्रवेश यादी जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, अनेक महाविद्यालयांनी या सूचनेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. बहुतेक महाविद्यालयांनी बुधवारी प्रवेश यादी जाहीर केली नाही.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eligibility points for degree admission decreased reputed colleges ysh

Next Story
अखेर राजीनामा; बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्र्यांकडून पदत्याग : महाविकास आघाडी सरकार कोसळले
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी