मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांच्या २०२० च्या सोडतीतील पात्र विजेत्या गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. ३,८९४ पैकी आतापर्यंत १,४२४ कामगार पात्र ठरले आहेत. त्यातील १०३ कामगारांनी घराची संपूर्ण रक्कम भरली आहे. त्यांना नुकतीच ताबापत्रे देण्यात आली. एका कार्यक्रमात पात्र कामगारांना लवकरच चाव्या देण्यात येणार आहेत.
बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवर बांधण्यात आलेल्या ३,८९४ घरांसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्च २०२० मध्ये सोडत काढण्यात आली. मात्र सोडतीनंतर काही दिवसांतच एका गिरणी कामगार संघटनेने या सोडतीवर आक्षेप घेतल्याने उच्च न्यायालयाच्या सनियंत्रक समितीने सोडतीला स्थगिती दिली. त्यामुळे सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया रखडली होती. मात्र, पुढे मुंबई मंडळाने सनियंत्रक समितीची परवानगी घेत पात्रता निश्चिती सुरू केली आणि त्यानंतर घरांचा ताबा देण्यासाठीही परवानगी मिळविली. त्यामुळे या सोडतीतील घरांचा ताबा देण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या असून आता पात्रता निश्चिती आणि ताबा प्रक्रियेने वेग घेतला आहे. त्यानुसार आता लवकरच १०३ पात्र विजेत्या कामगारांना घराचा ताबा देण्यात येणार आहे.
मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ३, ८९४ पैकी १,४२४ कामगारांची पात्रता निश्चिती पूर्ण झाली आहे. उर्वरित कामगारांची पात्रता निश्चिती सुरू असून काही प्रकरणे अपिलात आहेत. पात्र झालेल्या १,४२४ कामगारांना तात्पुरते देकारपत्र पाठवीत त्यांच्याकडून घरांची विक्री किंमत भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत १०३ विजेत्यांनी संपूर्ण रक्कम भरली आहे. त्यांना ताबा पत्रही वितरित करण्यात आले आहे. आता केवळ त्यांना घराची चावी देणे बाकी आहे. तेव्हा येत्या काही दिवसांतच चावी देण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान या १०३ पात्र विजेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका कार्यक्रमात चावी वितरित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
