मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा हे दोन राज्याच्या सेवेतील सनदी अधिकारी केंद्र सरकारमध्ये सचिवपदासाठी पात्र ठरले आहेत. केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने सचिवपदासाठी पात्र ठरलेल्या अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात १९८८ च्या तुकडीतील राजीव जलोटा आणि १९८९ च्या तुकडीतील चहल या राज्याच्या सेवेतील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जलोटा हे थेट सचिवपदासाठी तर चहल हे सचिव समकक्ष पदासाठी पात्र ठरले आहेत. सचिव समकक्ष पदासाठी पात्र ठरणाऱ्या अधिकाऱ्याची केंद्रातील महत्त्वाच्या सचिवपदावर नियुक्ती केली जात नाही. राज्याच्या सेवेतील अरविंद सिंह, अपूर्व चंद्र आणि राजेश अगरवाल हे तीन सनदी अधिकारी केंद्र सरकारमध्ये सध्या सचिवपदावर कार्यरत आहेत.

चहल यांनी करोनाकाळात केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यांच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली होती. केंद्र सरकारमध्ये सचिवपदासाठी पात्र ठरल्याबद्दल चहल यांनी ट्वीट करून सनदी सेवेत एक महत्त्वाची पायरी पार केल्याचे म्हटले आहे.