मुंबई : देशभरात अनेकांच्या मोबाइलवर शनिवारी साडेअकराच्या सुमारास ‘इमर्जन्सी अलर्ट’ झळकू लागला. केंद्र सरकारकडून मोबाइल-आधारित आपत्ती सतर्कता प्रणालीची चाचणी घेतली जात असून यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अधिक प्रभावीपणे आणि तात्काळ सूचना मिळणार आहे. मात्र, अनेकांना या प्रणालीविषयी काहीच माहिती नसल्याने नागरिकांमध्ये क्षणभर भीतीचे वातावरण पसरले होते. ही नवी प्रणाली कशा पद्धतीने कार्य करणार हे जाणून घेऊया.

दूरसंचार विभाग (डीओटी) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) यांच्या सहकार्याने देशभरात मोबाइल-आधारित आपत्ती संप्रेषण प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. नागरिकांना महत्त्वाची माहिती वेळेवर मिळावी यासाठी चाचपणी केली जात असून शनिवारी मोबाइवर आलेले संदेश हे याच प्रणालीचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या देशात हवामान बदल आणि उष्णतेची लाटसदृश्य स्थिती यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच अशा प्रकारचा संदेश मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या चाचपणीविषयी नागरिकांना पूर्वसूचना मिळायला हवी होती, असे अनेकांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे.

ही प्रणाली संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने (आयटीयु) शिफारस केलेल्या कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉलवर (सीएपी) आधारित आहे. सध्या ही प्रणाली भारतातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वापरण्यात येत आहे. तसेच विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील मोबाइल वापरकर्त्यांना संदेशाद्वारे आपत्ती व आपत्कालीन सूचना पाठवल्या जात आहेत.

‘सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टीम’ काय आहे ?

सरकारकडून चाचपणी करण्यात येणारी ‘सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टीम’ ही प्रणाली पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. सी -डीओटी ( सेंटर फॉर डेव्हलमेंट ऑफ टेलेमॅटीक्स ) यांना या सेल ब्रॉडकास्ट-आधारित अलर्ट प्रणालीची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. देशातील स्थानिक पातळीवर

दूरसंचार तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या उद्देशाने ही प्रणाली सुरू करण्यात येत आहे.

या प्रणालीमुळे कोणती माहिती मिळणार ?

आपत्कालीन सूचना किंवा इशारे देणाऱ्या या प्रणालीमुळे आणीबाणीच्या प्रसंगी मोबाइलवर संदेश प्राप्त होणार आहे. यामुळे त्सुनामी, भूकंप, वीज पडणे (लाईटनिंग स्ट्राईक्स) आणि वायू किंवा गॅस गळती, तसेच मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितीमध्ये वेळेवर अलर्ट दिले जाणार असून यामुळे नागरिकांना तात्काळ धोक्याची माहिती मिळणार आहे, असे सांगण्यात येत आहे.