Emergency Alert System मुंबई : केंद्र सरकारकडून शनिवारी अचानक नागरिकांच्या मोबाइवर आपत्कालीन संदेश येऊ लागल्याने नागरिकांमध्ये क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सरकारकडून मोबाइल-आधारित आपत्ती सतर्कता प्रणालीची चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे हे संदेश मोबाइलवर येऊ लागले आहेत. केंद्र शासनाच्या म्हणण्यानुसार, नागरिकांना अशा चाचणी संदेशाकडे दुर्लक्ष करण्याचा इशारा बुधवारी देण्यात आला होता. मात्र, अनेकांना याविषयी काहीच माहिती मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले
देशभरात अनेकांच्या मोबाइलफोनवर शनिवारी काही सेकंदांसाठी आपत्कालीन संदेश आले. यात भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवांकरिता स्वदेशी तंत्रज्ञानचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे, अशा आशयाचे संदेश देण्यात आले. तसेच ‘सर्तक राहा आणि राष्ट्राला सुरक्षित ठेवा’ असेही त्या संदेशात नमूद करण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आपत्कालीन संदेश प्रणाली काय आहे ?
दूरसंचार विभाग (डीओटी), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) यांच्या सहकार्याने देशभरात मोबाइल-आधारित आपत्ती संप्रेषण प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी सक्रियपणे काम करत असून, नागरिकांना महत्त्वाची माहिती वेळेवर मिळावी यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. मोबाइवर शनिवारी आलेला संदेश हा याच प्रणालीचा भाग असल्याचे सांगण्यात आले.
संपूर्ण भारतात प्रणालीचा वापर
ही प्रणाली संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने (आयटीयु) शिफारस केलेल्या कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉलवर (सीएपी) आधारित आहे. सध्या ही प्रणाली भारतातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वापरण्यात येत आहे. तसेच विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील मोबाइल वापरकर्त्यांना संदेशाचेद्वारे आपत्ती व आपत्कालीन सूचना पाठवण्यात येत आहेत.
संपूर्ण भारतात या प्रणालीच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून आणि सेल ब्रॉडकास्ट (सीबि) सुविधा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. लवकर ही प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू केली जाणार असून यामुळे देशभरात या प्रणालीची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी सध्या चाचणी सुरू आहे. या काळात नागरिकांच्या मोबाइलवर इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये चाचणी संदेश येतील, असे दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
